News Flash

झाडांचे नियोजन

जपानी लोकांत एक प्रथा आहे. दोन पैसे जरी त्यांनी कमविले, तर त्यातील एक पैशाची ते फुले आणतात आणि एक पैसा उपजीविकेकरिता वापरतात.

| January 15, 2015 12:30 pm

city-farmजपानी लोकांत एक प्रथा आहे. दोन पैसे जरी त्यांनी कमविले, तर त्यातील एक पैशाची ते फुले आणतात आणि एक पैसा उपजीविकेकरिता वापरतात. आज आपण शहरात आडवी वाढ होण्याऐवजी जागेच्या टंचाईमुळे उभी वाढ करीत आहोत.. ‘हाय राइज’ उंच मनोरे. या उभ्या वाढीत आपल्या गॅलरीत, गच्चीत, जिन्यामधील मोकळ्या जागेत, इमारतीच्या आवारात, आतल्या छोटय़ा-मोठय़ा रस्त्यांवर आपण झाडे लावत आहोतच. फक्त त्याचे नियोजन नाही. आपल्याला जी झाडे आवडतात, ती आपण लावत आहोत. या झाडांना किती ऊन आवश्यक असते, या झाडामुळे वातावरणावर काय परिणाम होतात, त्याला फुले कुठल्या रंगाची व कधी येतात, त्या फुलांना सुगंध येतो का, त्याचा कचरा किती होतो, ती पानगळ आहेत की सदाहरित, या सर्व गोष्टींचा विचार न करता झाडे लावल्यामुळे त्यांची नीट वाढ होत नाही किंबहुना ती मरतात. साधे तुळशीचे उदाहरण घेऊ. आपण गॅलरीत तुळस लावतो, तेथे जेमतेम एक-दोन तास ऊन येते. ऊन पुरेसे नसल्यामुळे हळूहळू रोप मरू लागते आणि दोन-तीन महिन्यांत रोप मरून जाते.
झाडे लावताना आपल्या कुठल्या जागेत किती काळ ऊन येते ते पाहून त्याप्रमाणे कमी-जास्त उन्हात वाढणारी योग्य त्या प्रकारची झाडे घ्यावीत. या झाडांच्या लागवडीवेळी पिशवीतून रोप कुंडीत लावताना मुलांना धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. झाडाला थोडेच पाणी द्यावे. कुंडीखाली एखादी प्लॅस्टिकची डिश ठेवावी, जेणेकरून कुंडीतून पाणी बाहेर आल्यास इमारतीच्या, गॅलरीच्या भिंतीवर ओघळणार नाही. भिंतीवर मातीचे डाग पडणार नाहीत. शक्यतो कुंडीतून पाणी बाहेर येईल एवढे पाणी घालूच नये. कारण तेवढय़ा पाण्याची आवश्यकता नसते. कुंडीच्या मातीत एक भाग माती + एक भाग सेंद्रिय खत + एक भाग कोकोपिट मिसळून कुंडी भरावी. झाडांवर स्प्रेपंपाने दर दोन-तीन दिवसांनी पाणी फवारावे.
रोपे आणताना शक्यतो हंगामी फुलझाडांची रोपे कळ्या असलेली आणावीत. ती दोन-तीन महिने आपल्याकडे फुलत राहतात. थोडक्यात, बुकेच्या किमतीपेक्षा कमी किमतीत ही जिवंत बुके आपल्याला दोन-तीन महिने दृष्टिसुख देत राहतात, तसेच बारमाही शोभेची झाडेसुद्धा आपल्याला कुंडीत लावता येतील. घराच्या आत मनीप्लँटच्या ऐवजी काळीमिरी, नागवेली म्हणजेच विडय़ाचे पान यांसारख्या वेली सावलीतसुद्धा छान जगतात. फुलांमध्ये अबोली ही थोडेसे जरी ऊन मिळाले तरी फुले देते. झाडांना जास्त पाण्यामुळे मर, कीड होते व फुले कमी येतात. झाडांना खूप पाणी लागत नाही, तर ओलावा लागतो. मातीमध्ये २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी व ५० टक्के माती अशा अवस्थेत मुळे जमिनीतून अन्न घेऊ शकतात.

कचऱ्याचे व्यवस्थापन करा
आपण हजारो टन कचरा करतो व शेजारच्या आवारात टाकतो किंवा जाळतो. शहरातील नगरपालिका हा कचरा उचलून जवळील गावांच्या आवारात टाकते (डम्पिंग ग्राऊंड). या गावांतील लोकांनी असे काय पाप केले आहे, की त्यांनी शहरातील लोकांचा कचरा, त्याचा दरुगध, त्यामुळे होणारे रोग यांना तोंड द्यावे. आज अनेक ठिकाणी ग्रामीण व शहरी लोकांत कचऱ्यावरून भांडणे सुरू आहेत.  तरी आता आपल्याकडे शहरात रिसायकल होणारा कचरा वेगळा करून गोळा केला जातो आणि त्याचा फेरवापर केला जातो. मुलुंडचे प्रा. वालावलकर या कचऱ्यासंबंधी खूपच चांगले काम करीत आहेत. ते तर सांगतात, ज्याच्याकडे कचरा गोळा करून साठविण्याची क्षमता आहे, तो खूपच श्रीमंत होऊ शकतो. आज विज्ञानाने कचऱ्यापासून ऊर्जा तयार करण्याची साधने विकसित केली आहेत. अनेक महापालिका घनकचरा व्यवस्थापन करीत आहेत. घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याप्रमाणे तो वेगवेगळा टाकला तर काही प्रमाणात कचरा कमी होतो. पुण्यासारख्या महापालिकेने ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत बनवणाऱ्या घरांना व सोसायटय़ांना टॅक्समध्ये पाच टक्के सूट दिली आहे. आज घरगुती सेंद्रिय कचरा, ओला कचरा जसे की भाज्यांची देठे, साले, उरलेले अन्न, निर्माल्य, खराब झालेले धान्य इत्यादी वापरून गांडूळ खत व गॅस तयार करण्याची छोटी युनिटे तयार झाली आहेत. घरातील दोन-तीन माणसांचा होणारा कचरा वापरून घरातील बागेसाठी खत तयार करू शकतो. अनेक शहरांत त्यासंबंधी वेगवेगळ्या सामाजिक संस्था व व्यक्ती प्रशिक्षण देत आहेत. ठाण्याच्या नंदिनी बोंडाळे या गच्चीवरील शेतीकरिता प्रशिक्षण देत आहेत. तसेच निळू दामले यांचे ‘माणूस व झाड’ हे पुस्तक खूप छान आहे.  

* गॅलरीत जागा व ऊन असेल तर सायली, जाई, जुई, कृष्णकमळ यांसारख्या सुगंध देणाऱ्या वेली लावाव्यात. यांना वर्षांतून ३-४ वेळा फुले येतात. मोगऱ्याला वर्षांतून एकदाच फुले येतात. मोगऱ्याला भरपूर ऊन लागते.
* फुलाप्रमाणे रोज वापरात असणारी औषधी वनस्पतीसुद्धा आपण कुंडीत लावू शकतो. जसे की गवतीचहा, वेखंड, पुदिना, कढीपत्ता, तुळस, इत्यादी.
’गच्चीवर अगदी पपई, लिंबू, सोनचाफा व बकुळ कलम, पारिजात, गुलाब, रातराणी, इत्यादी झाडे बाजारात मिळणाऱ्या ५० कि.च्या जुन्या ड्रममध्ये लावू शकतो. यासाठी माती आपण तयार करू शकतो. आवारातील काडी, कचरा, उसाच्या गुऱ्हाळातील पाचट व माती वापरून आपण कुंडय़ा भरू शकतो.
* कुंडीत किंवा ड्रममध्ये झाडांना आपण घरात चहाचा उरलेला चोथा धुऊन मातीवर टाकू शकतो (तसाच टाकल्यास मुंग्या होऊ शकतात.). ही चहाची पावडर हळूहळू कुजते आणि तिचे खत तयार होते. याचा कोणताही दरुगध येत नाही. चिलटे झाल्यास त्यावर पाण्यात थोडी हळद घालून ते पाणी या आच्छादनावर शिंपडावे. या आच्छादनामध्ये आपल्या घरातील भाज्यांची देठे, साली, फळांची साले (संत्रालिंबू सोडून) टाकत जावे, त्याचे हळूहळू खत तयार होते. तसेच आपला सेंद्रिय कचरा योग्य रीतीने मातीत मिसळून जातो.
* हळदीचे पाणी फवारल्यामुळे कीटकांची समस्या होत नाही. तसेच हे पाणी झाडावर फवारल्यास झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. दोन-चार दिवस घर बंद करून जाणार असाल तर कुंडीच्या खालच्या भांडय़ात पाणी भरून ठेवल्यास केशाकर्षणाने हे पाणी मातीत जाऊन माती ओली राहते आणि रोपांना पाणी मिळते.
* झाडे लागवडीचा छंद लावून घेतल्यास मुलांनासुद्धा याची आवड तयार होते. घरातील व्यक्तीचा वेळ चांगला जातो, तसेच शरीराला थोडा व्यायाम होतो. त्याचबरोबर घरातील कचऱ्यापैकी जवळजवळ ५० टक्के ते ७० टक्क्यांपर्यंत कचरा कुंडीतच कुजल्यामुळे घराबाहेर कमी जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 12:30 pm

Web Title: how to nurture home garden
Next Stories
1 सब कुछ गुलजार!
2 वृद्धेची सोनसाखळी लंपास
3 वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘वन वे’
Just Now!
X