परीक्षा घेण्याबाबत शासनाने विद्यापीठ, प्राचार्य आणि महाविद्यालयांना कितीही आग्रह केला असला व परीक्षा घेण्याची कितीही जय्यत तयारी करण्याचे आदेश शासनाने दिले असले तरी प्रत्यक्षात परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिकाच तयार नसल्यामुळे विद्यापीठांना परीक्षा घेणे केवळ अशक्य असल्याची विद्यापीठ वर्तुळात प्रतिक्रिया आहे.
राज्यातील ३५ हजार प्राध्यापकांचा ४ फेब्रुवारीपासून विद्यापीठ परीक्षा कामावर बहिष्कार सुरू आहे. राज्यातील अकराही विद्यापीठात प्रश्नपत्रिकांच्या मॉडरेशनचे काम
ठप्प झालेले आहे. त्यामुळे कोणत्याच परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार
झालेल्या नाहीत. प्रश्नपत्रिकाच नसल्यामुळे परीक्षा कशा घ्याव्यात, हा विद्यापीठ आणि प्राचार्यासमोरही
प्रश्न आहे.
विद्यापीठ परीक्षांवर बहिष्कार टाकणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन रोखण्याचा आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केला असला, प्राध्यापकांविरुद्ध एस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा दिला असला व फौजदारी कारवाईची तयारी केली असली तरी सरकारच्या या धमकीला आम्ही भीक घालणार नाही, असे यापूर्वीच एम. फुक्टोने म्हटले आहे. राज्यातील नागपूर व अमरावतीसह सात विद्यापीठांनी यापूर्वीच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, हे उल्लेखनीय.