सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळी स्थितीत पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना त्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जाणीवपूर्वक अन्याय करतात, असा आरोप करीत जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी होळीच्या दिवशी उजनी धरणाच्या डाव्या कोरडय़ा कालव्यात पाटकुल (ता. मोहोळ) येथे अजित पवार व सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचा अनोखा निषेध करीत ‘शिमगा’ साजरा केला.
उजनी धरणात पाण्याचा साठा खालावल्याने जिल्हय़ातील दुष्काळी स्थिती गंभीर झाली असून, पुणे जिल्हय़ातून पाणी सोडण्याची मागणी अजित पवार यांनी धुडकावून सोलापूरवर अन्याय केल्याचा आक्षेप जिल्हय़ातील दुष्काळग्रस्तांनी घेतला आहे. त्याबद्दलच्या भावना तीव्र असून त्याची परिणती या आंदोलनाच्या वेळी आली. उजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्या या दुष्काळग्रस्तांनी आपल्या घरासमोर होळी साजरी न करता कोरडय़ा कालव्यात उतरून पाण्यासाठी बोंब ठोकली.
माढा, पंढरपूर, मोहोळ व दक्षिण सोलापूर तालुक्यांतील ६८ गावे पिण्याच्या पाण्यासाठी उजनी डाव्या कालव्यातील पाण्यावर अवलंबून आहेत. या गावांतील पाण्याचे स्रोत पूर्णत: आटले आहेत. उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून हे दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर गेल्या ५६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. परंतु हे आंदोलन शासनाने बेदखल केले आहे. पाण्यासाठी सोलापूर जिल्हय़ावर अन्याय करणाऱ्या शासनातील मंत्री अजित पवार यांच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. त्याचाच भाग म्हणून पाटकुलचे सुदाम चौधरी, खरसोळीचे रामचंद्र ताड व अन्य शेतकऱ्यांनी कुरूल येथे कोरडय़ा कालव्यात उतरून अजित पवार व प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या नावाने बोंब ठोकत होळी साजरी केली.