उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल ७९.०१ टक्के लागला. विभागात धुळे जिल्ह्याने ८२.४४ टक्के गुणांसह अग्रस्थान मिळविले असून जळगाव (७३.३०) सर्वात पिछाडीवर आहे. नाशिक जिल्ह्याचा ८१.६७ तर आदिवासीबहुल नंदुरबारचा निकाल ७९.९८ टक्के लागला. यंदाच्या निकालाचे वैशिष्टय़े म्हणजे भ्रमणध्वनीवर सहजगत्या निकाल प्राप्त होत असल्याने निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेत नेहमी दिसणारी गर्दी यावेळी पुरती ओसरली होती. निकाल जाहीर झाला असला तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप त्या त्या महाविद्यालयांमध्ये सहा जून रोजी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये बारावाची परीक्षा घेण्यात आली होती. नाशिक विभागात १,२९,१०२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी १,०२,००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात नाशिक जिल्ह्यात ४४१४०, धुळे १७४९६, जळगाव २९४९७ आणि नंदुरबारमधील १०८७१ विद्यार्थ्यांंचा समावेश आहे. गुरूवारी निकाल जाहीर होणार असल्याचे घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही निकालाविषयी कमालीची उत्सुकता होती. सकाळी अकरा वाजता संकेतस्थळावरून निकाल जाहीर करण्यात आला. अनेक विद्यार्थी व पालक घरोघरी इंटरनेटवर खिळून होते. ज्यांच्याकडे ही व्यवस्था नव्हती, त्यांची निकाल जाणून घेण्याची उत्सुकता भ्रमणध्वनी कंपन्यांनी शमविली. आसन क्रमांक एका विशिष्ट क्रमांकावर पाठविल्यास विद्यार्थ्यांना क्षणार्धात त्याचे विषयनिहाय व एकूण गुण समजत होते. या कारणास्तव दरवर्षी सायबर कॅफेमध्ये होणारी गर्दी दिसली नाही. त्यामुळे कॅफेचालकही काहिसे नाराज होते. ज्यांना या प्रकारे गुण पहाता आले नाही, अशा काही तुरळक विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेत हजेरी लावल्याचे चालकांकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण सहा जून रोजी करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळातर्फे कनिष्ठ महाविद्यालयांना त्या दिवशी गुणपत्रिका दिल्या जातील. त्यामुळे दुपारनंतर महाविद्यालयांमार्फत त्यांचे वितरण केले जाणार आहे. विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक व एकूण गुण दर्शविणाऱ्या निकाल पुस्तिकेची यंदा छपाई करण्यात आली नाही. विभागातील पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३४.७४ टक्के लागला. परीक्षेला १८ हजार ५११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील ६ हजार ४३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी विहित नमुन्यात शुल्कासह १७ जून २०१३ पर्यंत मंडळाकडे अर्ज सादर करावे लागतील. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची साक्षांकीत छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. गुणसुधार योजनेतंर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३ व मार्च २०१४ अशा दोन संधी उपलब्ध राहतील, असे मंडळाने म्हटले आहे.
उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली असून त्यासाठी विद्यार्थ्यांना ३० मे ते १९ जून या कालावधीत ‘ऑनलाईन’ अर्ज भरावा लागणार आहे. या उत्तरपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी पाच दिवसांच्या आत त्यांच्या पुनर्मूल्यांकनाबाबत अर्ज सादर करू शकतील.
विभागात २८१
कॉपी बहाद्दर
कॉपी रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करूनही नाशिक विभागात बारावीच्या परीक्षेत २८१ कॉपी बहाद्दर सापडले होते. त्यात नाशिक जिल्ह्यात ४७, धुळे ३४, जळगाव १४७ आणि नंदुरबार जिल्ह्यातील ५३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना गैरमार्ग प्रकरणी शिक्षा सूचीनुसार शासन करण्यात आले आहे.