लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी केली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच लालबागमध्ये भाविकांची लगबग सुरू झाली होती. पहिल्याच दिवशी राजाचे ‘याचि देहि याचि डोळा’ दर्शन घेण्यासाठी भाविक नवसाच्या रांगेत उभे होते. तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने मैदानात भव्य मंडप उभारून बसण्याची व्यवस्था केली होती. रात्रीच भाविकांमुळे हा मंडप भरून गेला. दर्शनाच्या निमित्ताने रांगेत रात्र जागविणारे भाविक लालबागच्या राजाचा गजर करीत होते. पहाटे ४ च्या सुमारास मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी सपत्नीक पूजा केली आणि ५.३० वाजता सर्वसामान्यांसाठी राजाचे दर्शन खुले झाले.
सोमवार उजाडताच लालबाग गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेले. नैवेद्य विक्रीच्या दुकानांमध्ये उसळलेली गर्दी, हार-नारळ-फुले घेण्यासाठी उडालेली झुंबड असे दृश्य लालबागमध्ये दृष्टीस पडत होते. आपल्या लाडक्या राजासाठी नैवेद्य, फुले, हार घेऊन भाविक तासन्तास रांगेत उभे होते. ‘लालबागच्या राजा’च्या नावाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक भाविकांच्या मार्गदर्शनासाठी तैनात होते. रांगेतील भाविकांसाठी नाश्ता, चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा पहिल्या वर्षीच्या गर्दीने विक्रम केला, असे मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.राजाच्या चरणी अर्पण करण्यात येणारे कोटय़वधी रुपये सत्कारणी लावण्यासाठी मंडळाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. डायलिसिस सेंटर, रुग्ण साहाय्य योजना सुरू करून मंडळाने रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. तसेच लालबागचा राजा प्रबोधिनी, साने गुरुजी अभ्यासिका, स्वा. सावरकर ग्रंथालय, संत ज्ञानेश्वर पुस्तकपेढी, स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासवर्ग, लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र, आयएएस-एसपीएस प्रशिक्षण शिबीर, इंग्रजी संभाषण आदी उपक्रमांद्वारे मंडळाने शिक्षण सेवेचा संकल्प सोडला आहे.
डायलिसिस सेंटर
मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आठवडय़ातून दोन-तीन वेळा डायलिसिस करावे लागते. गोरगरीब रुग्णांना डायलिसिसचे दर परवडत नाहीत. अशा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आणि भाविकांनी राजाच्या चरणी अर्पण केलेल्या देणगीच्या मदतीने डायलिसिस सेंटर सुरू केले. एका वेळी १६ जणांचे डायलिसिस करण्याची येथे व्यवस्था असून अवघ्या १०० रुपयांमध्ये डायलिसिस केले जाते. तत्पूर्वी करण्यात येणाऱ्या आवश्यक त्या चाचण्या नामांकित डॉक्टरांच्या देखरेखीखाली केल्या जातात. आतापर्यंत हजारो रुग्णांवर येथे डायलिसिस करण्यात आले आहे.
रुग्ण साहाय्य योजना
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब रुग्ण मुंबईतील सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मंडळाकडून आर्थिक मदत केली जाते. आर्थिकदृष्टय़ा दुबळ्या असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेचाही खर्च मंडळाकडून केला जातो. रुग्णाचा आजार आणि उपचारावर येणाऱ्या खर्चावर ही मदत अवलंबून असते.
लालबागचा राजा प्रबोधिनी
बेताची आर्थिक स्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण रखडू नये यासाठी ‘लालबागचा राजा प्रबोधिनी’च्या माध्यमातून मंडळातर्फे विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत विविध अभ्यासक्रमांची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाचनप्रेमींची भूक भागविण्यासाठी कथा, कादंबऱ्या आदी साहित्यही उपलब्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना निवांतपणे अभ्यास करता यावा यासाठी साने गुरुजी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.