ज्यांना बस स्टॅन्ड किंवा रेल्वेचीही तिकिटे परवडत नाहीत, अशा पाश्र्वभूमीवर विमानाचा प्रवास करणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असेच वाटेल, पण भाऊ नगरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले व अनघा जोशी आणि रुबीना चव्हाण यांच्या मेहनतीतून आकारास आलेल्या विमानतळाची भव्य प्रतिकृती विमान प्रवासी अनभिज्ञ असणाऱ्या अनेकांना त्याबद्दल जाणून घेण्याच्या दृष्टीने पर्वणीच ठरली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन सामान्य विद्यार्थ्यांना विमानतळाबाबत असणाऱ्या बऱ्याच शंकांचे निरसन होणार आहे.
या निमित्ताने विमानतळाच्या प्रतिकृतीचे मिशन हाती घेऊन मुलांच्या भविष्यासाठी झटणाऱ्या रुबीना चव्हाण यांच्याशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेच्या राजकारणामुळे रखडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या विमानतळाच्या पाश्र्वभूमीवर कै. भाऊ नगरकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या विमानतळाची प्रतिकृती जनसामान्यांना नक्कीच थक्क करून टाकणारी आहे. खरे विमानतळ कधी साकार होईल याच्या खोलात न जाता या प्रतिकृतीचा आनंद घेऊन विमानतळ कसे असते, या क्षेत्रातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील का? याचे विभाग नेमके कोणते असतात? अशा अनेक शंकांचे निरसन हमीद  दलवाई यांच्या कन्या रुबीना चव्हाण यांनी केले. त्या म्हणाल्या, आपल्याकडच्या मुलींना एक हवाई सुंदरीची नोकरी सोडल्यास इतर कोणत्याही प्रकारचा यातून रोजगार प्राप्त होऊ शकतो याची थोडीशीही कल्पना नसते. त्यामुळे अनेक शंकांचे जंजाळ त्यांच्या मनावर असते. याच शंका विमानतळाच्या या प्रतिकृतीबरोबरच असणाऱ्या प्रश्नोत्तरातून सुटतील. हा शो ४५ मिनिटांचा असून यातून नोकरी मिळून रोजगाराची निर्मितीही होऊ शकते, याबाबतही मुलांना मार्गदर्शन केले जाते. विमानतळाबाबत माहिती देणारे हे एक स्टेडियम असून यामध्ये एका वेळी ३०० मुले बसू शकतात. ३ ते ५ जुलै या तीन दिवसात सुमारे २० हजार विद्यार्थी याचा लाभ घेतील, असेही त्यांनी सांगितले.