अवतार मेहेरबाबा यांच्या ४५व्या अमरतिथी उत्सवाला गुरुवारी मेहेराबाद (आरणगाव) येथे उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेपासूनच समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. विविध ७२ देशांमधील भाविक उत्सवासाठी येथे दाखल झाले आहेत.
मेहेरबाबांचा अमरतिथी उत्सव तीन चालणार आहे. आज दुपारी मेहेरबाबांची प्रार्थना व आरतीने या उत्सवाला प्रारंभ झाला. समाधीच्या दर्शनासाठी तत्पूर्वीच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. भाविकांच्या गर्दीने मेहेराबाद टेकडीचा परिसर फुलून गेला आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विश्वस्त संस्थेने समाधीच्या दर्शनासाठी टोकन पद्धतीचा अवलंब केला. एका वेळी ५०० भाविकांना टोकन देऊन दर्शनाची नेमकी वेळ देण्यात येत आहे. त्यामुळे गर्दीचे योग्य नियोजन झाले असून भाविकांनाही दर्शनासाठी फार काळ ताटकळावे लागणार नाही असे विश्वस्त मेहेरनाथ कल्चुरी यांनी सांगितले.
नगर शहराजवळील आरणगाव येथे दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो. मेहेरबाबांनी दि. ३१ जानेवारी १९६९ ला देहत्याग केला. त्यांच्या इच्छेनुसारच मेहेराबाद येथे त्यांना समाधिस्थ करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी येथे अमरतिथी उत्सव साजरा करण्यात येतो. उद्या (शुक्रवार) सकाळी ६ वाजता मेहेरबाबांची प्रार्थना व आरती होणार आहे. तसेच लोअर मेहेराबाद येथे धुनी प्रज्वलित करण्यात येईल. मेहेरबाबांनीच रचलेल्या रचना या वेळी सादर करण्यात येतील. त्यांनी दुपारी १२ वाजता देहत्याग केला. त्यानुसार परवा दुपारी १२ वाजता येथे १५ मिनिटांचे सामूहिक मौन पाळण्यात येणार आहे. त्यानंतर प्रार्थना होईल.
परवा (शनिवार) दि. १ला सकाळी भजने, गाणे, समूहगान, मेहेरबाबांवर आधारित गज़्‍ाल असे सांस्कृतिक कार्यक्रम होऊन दुपारची प्रार्थना व आरतीने उत्सवाची सांगता होईल.