छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पंधरावा विजय दिवस समारोह मोठय़ा दिमाखात पार पडला. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या विशेष निमंत्रितांची अनुपस्थिती, तसेच दरवर्षांप्रमाणे पार पडणाऱ्या लष्करी जवानांच्या चित्तथरारक कसरती, डॉग शो, हॅलिकॉप्टरची हवाई प्रात्यक्षिके यांचा समावेश नसल्याने उपस्थित हजारो नागरिकांचा आज चांगलाच हिरमोड झाला. तरीही, सलग सव्वातीन तास चाललेल्या विविध प्रात्यक्षिकांना मोठा प्रतिसाद मिळाला.
भारत सुंदरी अमृता थापर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, मेजर जनरल एस. के. यादव, विजय दिवस समारोह समितीचे सर्वेसर्वा कर्नल संभाजीराव कणसे – पाटील, कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते या मान्यवरांची उपस्थिती होती. परंतु, देशाभिमान वृध्दिंगत करणाऱ्या या कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेवरील बहुतांश मान्यवर तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची राहिलेली अनुपस्थिती चर्चेचा विषय बनून राहिली होती.  
सलग पंधराव्या वर्षीही परंपरेनुसार हजारोंच्या साक्षीने रविवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास विजय दिवसच्या मुख्य कार्यक्रमाला मोठया दिमाखात प्रारंभ झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विजय ज्योतीचे स्वागत करण्यात आले आणि भारत मातेचा एकच जयघोष झाला. भारत माता की जय, जय हिंदच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला.
पॅराग्लायडर व पॅरामोटारच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळय़ांचे पारणे फिटले. कोल्हापूर येथील मार्शल आर्टच्या शौर्य विद्य्ोच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या ह्रदयाचा ठोका चुकविला. तलवारबाजी, दांडपट्टा व लाठीकाठीतील शौर्य खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरले. त्यातील युवतींचा खेळ हे रणरागिणींचे रुप कौतुकास पात्र ठरले. लाहोटी कन्याप्रशालेच्या ३०० विद्यार्थिनींनी ‘चक दे इंडिया’ हे सामूहिक नृत्यगीत सुरेख सादर केले. बेळगावच्या मराठा लाईट इन्फट्रीच्या जवानांनी सादर केलेल्या मल्लखांब कसरती वाहवा मिळवून गेल्या. कसरतीदरम्यान घुटमळणाऱ्या विदुषकांचा खोडसाळपणा बालगोपाळांसह वयोवृध्दातही हशा पिकवून गेला. याच जवानांचे झांजपथकही चांगलेच रंगले. पुणे व ठाण्याच्या एरो मॉडेलिंग या रिमोटवरील विमाने व हेलिकॉप्टरच्या कसरती लक्षवेधी ठरल्या. त्यातील एक विमान स्टेडियमच्या उत्तर दिशेला एका उंच झाडात अडकून राहिले. दौंड पोलिसांच्या १७० जवानांनी शारीरिक कवायती (मास पेटी) सादर करताना आकर्षक कमळाच्या फुलातून श्रीकृष्णाचे दिलेले दर्शन मने जिंकून गेले. कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सैन्य दलाच्या बॅंडवर झालेल्या सवाद्य ‘वंदे मातरम् ने कार्यक्रमाचा समारोप झाला.