गावठी कट्टय़ातून सराफावर गोळीबार व एकाच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासाला गती नसल्याच्या निषेधार्थ भारतीय रिपब्लिकन पक्षाने मंगळवारी कर्जत बंदचे आवाहन करून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. बंदला शहरात चांगला पाठिंबा मिळाला.
अज्ञात चोरटय़ांनी दहा दिवसांपूर्वी भररस्त्यावर सराफ सुशांत कुलथे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्याबरोबर असलेले ज्योतिपाल घोडके ठार झाले. चोरटय़ांनी १५ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिनेही चोरून नेले. या घटनेला दहा दिवस होऊन गेले तरी तपासात प्रगती झाली नाही तसेच मृत ज्योतिपाल यांच्या कुटुंबीयांना कुठलीच आर्थिक मदतही मिळालेली नाही. याच्या निषेधार्थ भारिपने आज बंदचे आवाहन करून पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. आंदोलनात पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, अंबादास पिसाळ, नामदेव राऊत, अशोक खेडकर, सुनील शेलार, निळकंठ ठोसर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी लोकांच्या भावनांशी सहमती दर्शवून तपासाचे आव्हान आपण स्वीकारले असल्याचे सांगितले.