दुहेरी कर आकारणीच्या निषेधार्थ सोमवारी कोल्हापूर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, आइस्क्रीम पार्लर बंद ठेवण्यात आले होते. या आंदोलनाला हॉटेलचालकांकडून पूर्णत: प्रतिसाद मिळाला. यामुळे पर्यटकांसह खाद्यगृहांवर अवलंबून असणाऱ्या हजारो नागरिकांना आज टपरी, फिरते विक्रेते यांचा आधार घेऊन आपली क्षुधाशांती करावी लागली. आजच्या बंदमध्ये शहरातील २०० हॉटेल, ३५० रेस्टॉरंट, ७५ आइस्क्रीम पार्लर यांचा समावेश होता.     
राज्य शासन खाद्यपेय विक्रीवर पूर्वीपासून व्हॅट कर आकारत आहे. आता त्याच विक्रीवर केंद्र शासनानेही सेवा कर आकारणे बंधनकारक केले आहे. एकाच वस्तूच्या विक्रीवर दुहेरी आकारणी होत असल्याने त्याचा बोजा सामान्य ग्राहकांवर पडत आहे. त्या विरोधात राज्यस्तरीय असोसिएशन हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, इंडियन हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी केंद्र शासनाकडे पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय या संघटनांनी दुहेरी कर आकारणीला विरोध म्हणून सोमवारी शहरातील सर्व खाद्यगृहे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला हॉटेल व्यावसायिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.     
हॉटेल बंद ठेवून हॉटेलचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दुहेरी कर आकारणीच्या निषेधाची पोस्टर्स तेथे फडकावण्यात आली. कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष शिवराज जगदाळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सुभाष कळंत्रे, खजिनदार बाळासाहेब कदम, जनसंपर्कप्रमुख अरुण भोसले-चोपदार, आशिष रायबागे, सिद्धार्थ लाटकर, कांतीभाई चोरडिया, जयवंत पुरेकर आदींनी या आंदोलनात भाग घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.     
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, आइस्क्रीम पार्लर बंद राहिल्याने शहरवासीयांसह पर्यटकांची चांगलीच अडचण झाली. परीक्षा संपल्यामुळे पर्यटकांची गर्दी शहरात दिसू लागली आहे. या पर्यटकांच्या निवासाची सोय झाली असली तरी उत्तम प्रतीचे कोल्हापुरी जेवण त्यांना मिळणे दुरापास्त झाले होते. कार्यालयीन व्यापारी कामकाजासाठी शहरात वावर असणाऱ्या नागरिकांनाही रस्त्याकडेच्या टपऱ्या, फिरते विक्रेते यांच्याकडील उपलब्ध खाद्यपदार्थ घेऊन भूक भागवावी लागली.