स्थानिक संस्था कर (एलबीटी) याला विरोध करण्यासाठी शहरातील व्यापारी सोमवारी ताकदीने आंदोलनात उतरले होते. सोमवारच्या व्यापार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ हजारांहून अधिक व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने व्यापारपेठेचा भाग सुनासुना वाटत होता. एलबीटी विरुद्धचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी दिला आहे.
एलबीटीच्या विरोधात राज्यभरात सोमवारी बंदचे आयोजन केले होते. कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनीही या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. राजारामपुरी, शाहूपुरी, सराफ कट्टा, ताराबाई रोड, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी आदी व्यापाराचे केंद्रस्थान असलेल्या भागातील बहुतांशी दुकाने बंद होती. धान्य, कपडे, सोने-चांदी यासह अन्य प्रकारची दुकानेही बंदमध्ये सहभागी झाली होती.
आजच्या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला असल्याचे नमूद करून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कोरगावकर म्हणाले, एलबीटी कमी करून व्हॅटमध्ये १ टक्के वाढ केली पाहिजे. अन्यथा व्यापारी मालावर दहा टक्के सरचार्ज लावण्याच्या मन:स्थितीत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेने आकारल्या जात असलेल्या एलबीटीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तसेच पुणे महानगरपालिका व अन्य महापालिकांमध्ये सुरू झालेल्या एलबीटी विरोधाला कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा पाठिंबा राहणार आहे.