लिंबूवर्गीय फळांमध्ये फुटबॉलएवढे, पण तेवढेच पौष्टिक फळ आणि दुसरीकडे सापाच्या आकाराचा रोबोट.. नजर या स्टॉलवर फिरवायची की समोरच्या स्टॉलवर.. प्रचंड गर्दीतील चिमुकल्यांची नजर कधी आश्चर्याने तर कधी कुतूहलाने वेगवेगळया स्टॉल्सकडे वळत होती. रामन विज्ञान केंद्रात विज्ञान आणि समाज यांना एकत्रित आणणाऱ्या चौथ्या विज्ञान मेळयाला चिमुकल्या विद्यार्थ्यांची गर्दी होती.
राज्यातील तेरा विज्ञान आणि संशोधन संस्था या मेळयात सहभागी असून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ओळख या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न यात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित युगात समाज वावरत असला तरीही त्यातील अनेक गोष्टींबाबत ते अनभिज्ञ आहेत. ही अनभिज्ञता दूर सारून समाज आणि विज्ञान यांना जवळ आणण्याचा प्रयत्न गेल्या चार वषार्र्पासून नागपुरात सुरू आहे. अँथ्रॉपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नागपूर, नॅशनल एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट नागपूर, ऑटोमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्प्लोरेशन अँड रिसर्च नागपूर, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायट्रस नागपूर, भारत संचार निगम लिमिटेड, नागपूर, न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई, सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर कॉटन रिसर्च, नागपूर, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, नागपूर, गव्हर्मेट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नागपूर, रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर, नागपूर, इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअरिंग, नागपूर, विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर, रामन सायन्स सेंटर आणि प्लॅनेटेरियम, नागपूर अशा तेरा संस्था यात सहभागी आहेत.
भारत संचार निगम लिमिटेडचे सुरुवातीचे ते आतापर्यंतचे तंत्रज्ञान आणि पूर्वी वापरण्यात येणारे फायबर ते जीएसएम टेलिफोन, मॉडेम याची मॉडेलसह माहिती विद्यार्थ्यांना समजेल या पद्धतीने मेळाव्यात प्रदर्शित करण्यात आली आहे. सिकलसेलचा विळखा महाराष्ट्र ते ओरिसा या सर्वच ठिकाणी आहे. रक्ताच्या तपासणीपासून तर सिकलसेल असेल तर त्यामागची कारणे नागरिकांना समजावण्यापासून ते उपचारार्पयची सर्व माहिती भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षण संस्थेच्यावतीने दिली जात आहे. गेल्या वर्षी या स्टॉल्सवर सुमारे ६०० नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली होती आणि त्यातील २८-३० जणांना सिकलसेलचे निदान झाले होते. लाखो वर्षांपूर्वीचे मानवी अस्तित्व कसे होते याविषयीसुद्धा माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. खणीकरण कसे असते, युरेनियम कसे काढले जाते आणि त्या युरेनियमपासून न्युक्निअर एनर्जी कशी तयार केली जाते, याचे प्रात्यक्षिक परमाणू खनिज सर्वेक्षण व अनुसंधान निर्देशालयाच्या स्टॉलवर आहे. सॅटेलाईट मॉडेल्स, जीएसएलव्ही, पीएसएलव्हीपासून नेमके काय काम केले जाते, हे भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनेच्या स्टॉल्सवर सांगितल्या जात आहे. संत्रा, मोसंबी या लिंबूवर्गीय फळांमध्ये पमेलो हे फुटबॉलच्या आकाराचे, पण तेवढेच पौष्टिक फळसुद्धा लिंबूवर्गीय फळ अनुसंधान केंद्राच्या स्टॉलवर आहे. याशिवाय अ‍ॅटानॉमस रोबोट, एअर कंडिशनरचे कसे काम करते, कॅन्सर कसा ओळखायचा हेदेखील या मेळयात बघायला मिळते.

चौथ्या विज्ञान मेळयाचे उद्घाटन हैदराबादच्या डाटा प्रसंस्करण अनुसंधान संस्थेच्या संचालक गीता वर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञानाचे क्षेत्र खूप मोठे आहे. त्यात जेवढे खोलवर शिरण्याचा प्रयत्न तुम्ही कराल, तेवढे खोल शिरता येईल. विज्ञान शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी कठीण असले तरीही मुलांना प्रायोगिक दृष्टीकोनातून शिकवले तर लवकर समजेल. अलीकडची पिढी खूप वेगवान आहे. विज्ञानाने अनेक समस्या निर्माण झाल्या असल्या तरी, त्या समस्यांवर उपायसुद्धा विज्ञानानेच शोधून काढले आहेत. त्यामुळे विज्ञानाच्या जवळ येण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी नेहमी शिक्षकांना अनुत्तरीत करणारे प्रश्न विचारत राहिले पाहिजे. शिक्षकांनीसुद्धा तेवढेच विचारपूर्वक त्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असे प्रतिपादन नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांनी केले. वैज्ञानिक संस्थांमध्ये नेमके काय चालते याविषयी माहिती देतानाच या विज्ञान मेळयाच्या आयोजनामागील भूमिका त्यांनी व्यक्त केली.