दादर पूर्वेला सरकारी वसाहतीत राहणारे अतिरिक्त पोलीस आयुक्त कैसर खलिद यांनी वाहतूक विभागाचा कार्यभार स्वीकारताच आपल्या घरासमोरील सार्वजनिक रस्ता वाहनांना बंद करून टाकला आहे. खलिद महाशयांना बहुधा वाहनांच्या हॉर्नचा वा धुराचा त्रास होत असावा. हा रस्ता बंद करून स्वत:ची सोय पाहणाऱ्या वाहतूक विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी वाहतुकीची कोंडी कमी करण्याऐवजी दादर टीटी जंक्शनवरील आधीच्याच कमालीच्या वाहतूक कोंडीत अधिकच भर घातली आहे. याबाबत सहआयुक्त डॉ. भूषण उपाध्याय यांच्याकडे रहिवाशांनी लेखी तक्रार केली आहे. याविरोधात प्रसंगी उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार हिंदू कॉलनीतील रहिवाशी करीत आहेत.
परळ, लालबाग, हिंदमाताकडून दादर पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पूल हा सगळ्यात प्रचलित मार्ग आहे. परंतु या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. आंबेडकर मार्गावरून या पुलाकडे जाणारा मुख्य रस्ता खोदादाद सर्कलमधून जातो आणि पर्यायी रस्ता हॉटेल प्रीतमकडून जातो. प्रीतमच्या रस्त्यावरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. खलिद येथेच वास्तव्याला होते. मात्र वाहतूक विभागाचा कार्यभार मिळताच त्यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून टाकला. इतकेच नव्हे तर या ठिकाणी दोन-दोन शिपाईही तैनात केले. फक्त पोलिसांच्या व तेथे राहणाऱ्या रहिवाशांच्या गाडय़ांनाच या रस्त्यावर प्रवेश देण्यात येतो. टिळकपुलावरील वाहतूक कोंडी सोडवण्यास अनेकदा वाहतूक पोलीस हजर नसतो. परंतु कैसर महाशयांची मर्जी राखण्यासाठी मात्र प्रीतम हॉटेलच्या तिठय़ावर दोन पोलीस तैनात असतात.
हा रस्ता बंद केल्यामुळे परळकडून येणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. या पर्यायी रस्त्यामुळे दादर टीटी सर्कलच्या अलीकडील पु. भा. भावे चौकातील तसेच प्रत्यक्ष सर्कलमधील आणखी दोन सिग्नल टळतात. या पर्यायी मार्गामुळे दादर टीटी सर्कलच्या सिग्नलवर बेस्ट बसेसोणि सरळ शीवकडे जाणाऱ्या गाडय़ाच मुख्यत्वे थांबतात. दादर पश्चिमेकडे जाणाऱ्या गाडय़ा प्रीतम हॉटेलशेजारच्या गल्लीतून थेट टिळक पुलावर बाहेर पडतात. परंतु आता हा रस्ता बंद केल्यामुळे या गाडय़ांना तीन सिग्नलचा अडथळा ओलांडून जावे लागत आहे. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास हिंदू कॉलनीतील वाहनांना होत आहे.
हिंदू कॉलनीतून टिळक पुलावर जाणारी वाहने एरवी टिळक पुलाखालून स्वामीनारायण मंदिरासमोर डावीकडे वळतात आणि लगेच प्रीतमच्या गल्लीत पुन्हा डावीकडे वळून टिळक पुलावर येतात. हा मार्ग चिंचोळा असला तरी गाडय़ा पुढे सरकत राहतात. परंतु प्रीतमची गल्ली ‘नो एन्ट्री’ झाल्याने या गाडय़ांनाही आता पुढे आंबेडकर रोडवर येऊन दादर टीटी सर्कलमार्गे टिळक पुलावर यावे लागत आहे. आणि विनाकारण वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. या ‘नो एन्ट्री’विरोधात रहिवाशांनी सहआयुक्त डॉ. भूषण उपाध्याय यांच्याकडे निवेदनही दिले आहे. हा सार्वजनिक रस्ता असतानाही त्याचा खासगी वापर कसा होऊ शकतो, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.
अधिसूचनेवर तारीखच नाही; मग हरकतींना कोण विचारणार?
अतिरिक्त आयुक्त कैसर खलिद यांनी रस्ता बंद करण्याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेवर कोणतीही तारीख नाही. अशा प्रवेश बंदीला आक्षेप असल्यास सात दिवसांत हरकत घेण्याचे आवाहन त्यात करण्यात आले आहे. परंतु या अधिसूचनेवर तारीख नसल्यामुळे हरकती कोण लक्षात घेणार, असा सवाल विचारला जात आहे.