कधी वैयक्तिक पातळीवर तर कधी सामूहिक स्वरूपात होणारी कॉपी रोखण्यासाठी ‘गैरमार्गाशी लढा’नावाचे अभियान राबवूनही अजूनही कॉपीबहाद्दर बोकाळलेले आहेत. बारावी परीक्षेच्या निकालातून या गैरप्रकारावर प्रकाशझोत पडला आहे. पूर्वीच्या तुलनेत कॉपी करण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी नियोजनबद्ध व सर्व घटक समावेशक अभियानाचा कृती कार्यक्रम राबवूनही कॉपीला पूर्णत: रोखणे माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाला शक्य झालेले नाही. उलट सामूहिक प्रकारे होणारी कॉपी रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.     
दहावी-बारावीच्या मंडळाच्या परीक्षेवेळी कॉपी करण्याचे प्रकार हा शिक्षण क्षेत्रातील गंभीर विषय बनला आहे. कॉपी करण्याच्या विविध प्रकारांची आणि कॉपी पोहोचविण्याची तऱ्हेवाईक पद्धतीची जोरदार चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व समाजाच्या विविध घटकांकडून कॉपीच्या प्रकारावर टीका झाली. कॉपीचे समूळ उच्चाटन करावे या मागणीने जोर धरला. त्याची दखल घेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबद्ध व सर्व घटक समावेशक असा गैरमार्गाशी लढा हा कृती कार्यक्रम आखला. राज्यभरात त्याचा एकसूत्री कार्यक्रम ठरवून नियोजन करण्यात आले. त्यासाठी स्थानिक दक्षता समिती व केंद्रस्तर पालक सभा, विद्यार्थ्यांचे उद्बोधन, प्रजासत्ताकदिनी प्रतिज्ञा असे अभियान राज्यभर राबविण्यात आले.    
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या वैचारिक मनोवृत्तीत सकारात्मक बदल झाला. परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत झाली, असे मत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूत्रांकडून गुरुवारी निकालानंतर व्यक्त केले गेले. त्यांच्या मतानुसार कॉपीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. शिक्षण मंडळाच्या उपक्रमांना चांगले यश मिळत असल्याचेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कॉपी करण्याचे प्रकार आजही सुरू आहेत. त्यामुळे मंडळाचा दावा पूर्णत: खरा मानला जावा, अशी स्थिती नाही.    
मंडळाच्याच माहितीनुसार मार्च २०१३ च्या परीक्षेत कोल्हापूर विभागात कॉपीचे ६३ गैर प्रकरणे आढळली. त्यामध्ये १ तोतयाचे प्रकरण होते. या तोतयास पुढील ५ परीक्षांना बसता येणार नाही, अशी शिक्षा जाहीर करण्यात आली आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेला (नोव्हेंबर) बसता येणार नाही. या माहितीवरून कॉपीचे प्रमाण अजूनही कायम असल्याचे स्पष्ट होते. उलट मंडळाने सादर केलेले माहितीचे चित्र वस्तुस्थितीला धरून नसल्याचे मत शिक्षण क्षेत्रातूनच व्यक्त होत आहे.     
परीक्षा केंद्रांवर कॉपी होण्याचे प्रमाण आजही लक्षणीय प्रमाणात आहे. मात्र कॉपीचा गैरप्रकार आढळल्यानंतर शिक्षकांच्या नोकरीवर येणारी गदा आणि रोखली जाणारी वेतनवाढ या शिक्षेच विचार करून कडक कारवाई करण्याचे टाळले जाते, असे काही शिक्षकांचेच म्हणणे आहे. तालुक्याच्या पातळीवरील गावांमध्ये, निमशहरी भागातील काही शाळा-कॉलेजमध्ये तर सामूहिक कॉपी होत असते. एकाच गावातील, शहरातील विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांमध्ये गेलेले असतात. मात्र गावातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात अडू नये यासाठी सामूहिक कॉपी केली जाते. काही केंद्रांमध्ये तर फळ्यावरच उत्तरे लिहिली जातात, अशी धक्कादायक माहिती मंडळाच्याच एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. अशा प्रकारच्या केंद्रांवर लक्ष केंद्रित करून कॉपीचा प्रकार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना, कारवाई करणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. केवळ पथक आले असतानाच त्यांच्यासोबत असणारे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. त्यांची पाठ वळताच कॉपीला उधाण येते. ते रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसी टी.व्ही.लावण्याची उपाययोजना करता येणे शक्य आहे. प्रश्न आहे तो खर्चीक उपाययोजना शासन व मंडळ करणार का याचाच.