जात, धर्म व पंथ तसेच भेदाच्या भिंती पार करून माणुसकीचा धर्म वाढविण्यासाठी आपण सक्रिय राहिले पाहिजे, असे प्रतिपादन श्रुतीसागर आश्रमाचे प्रमुख स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केले. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सेवाव्रती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अखिल महाराष्ट्र मांग गारुडी समाज महासंघाचे अध्यक्ष विठ्ठलराव नाडे, प्राणीप्रेमी राजू कुमावत, श्याम व प्रकाश तुपे, वाल्मीकी समाजातील युवा कार्यकर्ता सोनू कागडा, वैज्ञानिक वस्तुनिर्मिती व विद्यार्थ्यांना गोडी लावणारे निवृत्त अभियंता सतीश भिडे यांचा प्रतिष्ठानतर्फे स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते सेवाव्रती पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सरस्वती म्हणजे वेदाध्यायन हे अलौकिक कार्य आहे. ध्वनिमुद्रिकेद्वारे पूजाअर्चा करता येईल, परंतु शुद्ध आचरणाचे काय करणार? समाज पुढे नेण्यासाठी चारित्र्यसंपन्न, नीतिवान माणसांची गरज आहे. तुमची जात, धर्म कोणताही असो. तुम्ही प्रथम माणूस आहात हे लक्षात ठेवा. आपणाला मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना देता आले पाहिजे. सर्व समाजांना बरोबर घेऊन चला हेच भारतीय संस्कृतीचे ऐश्वर्य असल्याचे स्वामींनी सांगितले.
या वेळी सर्वधर्मसमभाव व सौहार्द वाढविण्यासाठी दक्षता अभियानतर्फे पुढाकार घेण्याची ग्वाही मते यांनी दिली. ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र पैठणे यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद पैठणे यांनी आभार मानले.