कल्याण आणि अंबरनाथ ग्रामीण भागातील नेवाळी फाटा येथे स्वस्त दरात बैठय़ा चाळींमध्ये घरे देतो सांगून विकासकाने सुमारे शंभर नागरिकांना आश्वासन दिले. घरासाठी आगाऊ नोंदणी म्हणून या नागरिकांकडून धनादेश, रोखीने सुमारे १ कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांच्या रकमा वसूल केल्या. घर ताब्यात मिळण्याचे दिवस उलटून गेले तरी घर तयार नाही आणि विकासकाचे कार्यालय बंद असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी भागात संरक्षण दलाची विमानतळासाठी राखीव १६०० एकर जमीन आहे. या जमिनीवर स्थानिक रहिवासी शेती करतात. कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली शहरांमध्ये जमिनी शिल्लक न राहिल्याने भूमाफियांनी या सरकारी जमिनीवर अनधिकृत चाळी, इमारती उभारण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. या भागाचे नियोजन प्राधिकरण असलेले महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण, जागेची मालक संरक्षण दलाची यंत्रणा या गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्याने अनधिकृत बांधकामे उभारून त्यामधील घरे नागरिकांना विकण्याचा धंदा या भागात भूमाफियांकडून सुरू आहे.
कल्याणमधील वलीपीर रस्त्यावर ‘गजानन होम’ बांधकाम कंपनीचे कार्यालय होते. या कंपनीने जाहिरात करून बदलापूर पाइपलाइन, नेवाळी फाटा येथे स्वस्तात घर देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मुंबई, ठाणे परिसरातील नागरिकांनी या जाहिरातीला भुलून या घरांसाठी नोंदणी केली. बोरिवलीतील काजूपाडा येथे राहणारे तानाजी शंकर लोंढे यांनी या बांधकाम कंपनीत घरासाठी पैसे भरणा केले. जमीन मालक व विकासक सुरेश पोळ, जनार्दन जाधव, अर्जुन जाधव, साईनाथ जाधव असे एकूण पाच जण नागरिकांना घरांची माहिती कार्यालयात देत होते. सुमारे शंभर नागरिकांनी घरांसाठी नोंदणी करून पैसे भरणा केले. १ कोटी ८२ लाखांची रक्कम जमा झाल्यानंतर लवकर घर मिळेल, या आशेवर नागरिक होते. मात्र महिने उलटून गेले तरी घर मिळत नाही. विकासक मोबाइल उचलत नाही. विकासकाचे कार्यालय अनेक दिवस बंद असल्याचे आढळून आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर तानाजी लोंढे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन, ग्रामपंचायतींचे भूमाफियांवर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याने पालिकेच्या राखीव, वन, मोकळ्या जमिनी हडप करण्याचे सत्र माफियांकडून सुरू आहे.  दीड वर्षांपूर्वी नेवाळी भागात अशाच प्रकारे सुमारे शंभरहून अधिक नागरिकांना घरे देण्याचे आश्वासन देऊन काही भूमाफियांनी लाखो रुपयाची त्यांची फसवणूक केली होती. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.