महावितरणच्या नांदेड परिमंडळातील ज्या फीडरवर वीजहानीचे प्रमाण ६५ ते ७५ टक्के आहे, अशा फीडरअंतर्गत कार्यरत शंभरावर कर्मचाऱ्यांना हानीस जबाबदार धरून कारवाईच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. या साफसफाई मोहिमेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
वीजहानीचे प्रमाण खाली आणणे, तसेच मोठय़ा थकबाकीदारांकडील वसुली करण्याच्या दृष्टीने मुख्य अभियंता सतीश करपे यांनी कडक उपाय योजले आहेत. त्यांच्याच आदेशान्वये नांदेड-वाघाळा मनपाच्या काबरानगर येथील पंप हाऊसची वीज तोडण्यात आली. त्यामुळे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला चांगलाच हादरा बसला. मनपाच्या पाणीपुरवठा योजनेवरील वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती बाहेर येत असतानाच महावितरणने अंतर्गत साफसफाईचे काम हाती घेतल्याचेही समजले.
परिमंडळातील नांदेड मंडळामध्ये जी. १, २, व ३ या वर्गवारीत २३ फीडर असून, जुलैअखेरच्या अहवालानुसार तेथे वीजहानीचे प्रमाण ६५ ते ७५ टक्के आहे. वीजचोरी व गळती थांबविणे ही कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी असली तरी वरील फीडरवर सुधारणा दिसत नसल्याचे पाहून मुख्य अभियंत्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले आहे. कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, तसेच लाईनमन यांचा फीडरशी थेट संबंध असतो. त्यानुसार मंडळातील २३ फीडरशी संबंधित कर्मचाऱ्यांवर करवाई करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या जात असल्याच्या माहितीला करपे यांनी दुजोरा दिला.
सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी करपे नांदेडला रुजू झाले, तेव्हा हिंगोली जिल्ह्य़ाची स्थिती खूप खराब होती. हानी जास्त व वसुली कमी असे तेथे चित्र होते. पण करपे यांनी आपल्या जिल्ह्य़ातील हे चित्र बदलले. जी १ ते ३ वर्गवारीत त्या जिल्ह्य़ात एकही फीडर नाही; पण शेजारच्या परभणी जिल्ह्य़ात जी १मध्ये १२, जी २मध्ये ११ तर जी ३मध्ये ३१ फीडर आहेत. अशा ५४ फीडरवरील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून कारवाईचा इशारा देण्यात आल्याने संबंधितांत खळबळ उडाली आहे.