जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील १५१ आरोग्यसेविकांना सेवेत नियमित करणे, त्यांना व आरोग्य सहायकांना कालबद्ध पदोन्नती आदी विविध मागण्या २८ फेब्रुवारीपर्यंत मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. पी. डी. हंडाळ यांनी दिल्यानंतर जिल्हाभरातील सुमारे ४५० महिला आरोग्य कर्मचारी (एएनएम) व महिला आरोग्य पर्यवेक्षिकांनी (एलएचव्ही) यांनी जि. प.च्या आवारात सकाळपासून सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेतले.
महिला आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा लता पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्हा आरोग्याधिका-यांनी यापूर्वीही मागण्या मान्य असल्याचे लेखी आश्वासन ऑगस्ट २०१३ मध्ये दिले होते. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा काम बंद आंदोलन करून बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला. संघटनेने जिल्हा आरोग्याधिका-यांबरोबरच विभागात संबंधित कर्मचा-यांकडूनही वेळेत प्रश्न मार्गी लावण्याची लेखी हमी घेतली.
चर्चेत डॉ. हंडाळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सांगळे, संघटनेच्या पदाधिकारी पाटील, मंदा माने, मंजूषा गंधे, अलका खोकराळ, ए. एच. शेख, अलका शिंदे, लता कार्ले आदी सहभागी झाल्या होत्या. रिक्त पदांवर नियमित आरोग्य सहायक महिलांची पदोन्नतीने नियुक्ती करावी, एलएचव्हीची पदे पूर्णपणे आरोग्य सेविकेतून भरावीत, पर्यवेक्षिकांची पदे पदोन्नतीने भरावीत, एएनएमची पदे सरकारकडे वर्ग करावीत आदी दहा प्रमुख मागण्या आहेत.