महावितरण कंपनीतील रिक्त जागांवर कायम करावे, या मागणीसाठी गेल्या आठ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचा-यांनी शुक्रवारपासून साखळी उपोषण सुरू केले. या कर्मचा-यांनी बुधवारपासून महावितरणच्या मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी शुक्रवारपासून साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.
    महावितरणमध्ये राज्यभरात सुमारे हजारावर कंत्राटी कामगार काम करीत आहेत. जीव धोक्यात घालून गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हे कामगार अल्प वेतनावर सेवा बजावत आहेत. या कामासाठी शासन ठेकेदारास प्रत्येक कामगाराकरिता मासिक १२ हजार रुपये देते. प्रत्यक्षात ठेकेदार मात्र कंत्राटी कामगारांच्या हाती ५ ते ६ हजार रुपयेच देतात. शिवाय भविष्यनिर्वाह निधी, कामगार विमा याचा लाभ मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटी कामगारांनी महावितरणच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार कृती समितीचे अध्यक्ष मयूर गवते, उपाध्यक्ष सोमनाथ गोडसे, चंद्रकांत कांबळे, परिला काटकर, सुनीता म्हेत्रे, रवि कांबळे, गीतांजली कोडगे यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.