परिस्थिती दुष्काळी असली म्हणून लगीन करायचं कोणी थांबवलंय का ?..नाही ना ! मग आमच्या कुलगुरूंच्या मुलीचा नियोजित विवाह सोहळा सर्वाच्या डोळ्यांत का खुपत आहे ? दुष्काळाची जाणीव त्यांनाही असेलच की ! त्यामुळेच शाही सोहळ्याचे नियोजन करावयास ते राष्ट्रवादीचे मंत्री का आहेत ? ज्याच्या नांवातच ‘मुक्त’ आहे, त्या विद्यापीठाचे प्रमुखपद सांभाळणे किती कठीण असेल त्याची जाणीव आहे कोणाला ? आपल्या कुलगुरूंच्या मनातील हे दुखणं विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मात्र बरोबर ओळखलं आहे. त्यामुळेच तर मुलीच्या लग्नानिमित्त कुलगुरूंच्या डोईवर आलेला भार आपल्यापरीने हलका करण्याच्या प्रयत्नात जो तो लागलेला आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे प्रेम पाहून भारावलेल्या कुलगुरूंनी जवळपास प्रत्येकाच्या नांवाने स्वत: निमंत्रण धाडल्याने समस्त कर्मचारीवर्ग कृतकृत्य झाला असून हे लगीन म्हणजे आपल्या घरातीलच कार्य समजून नव्या जोमाने ते कामाला लागले आहेत. १३ मार्च रोजी होणाऱ्या या विवाह सोहळ्यासाठी विद्यापीठाचे भलेमोठे वऱ्हाड मुंबईला निघण्याची चिन्हे आहेत. अवघ्या यंत्रणेला या लग्नाची उत्सुकता असल्याने त्या दिवशी विद्यापीठाच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करताना येणारी जबाबदारी वेगळी आणि वधूपिता म्हणून येणाऱ्या जबाबदारीचं ओझं वेगळं याची जाणीव डॉ. आर. कृष्णकुमार यांना निश्चितच झाली असेल. त्यामुळेच तर १३ मार्च रोजी मुंबई येथे होणाऱ्या या सोहळ्यात कसलीच त्रूटी राहू नये यासाठी त्यांनी विद्यापीठातील स्थायी, अस्थायी व कंत्राटावर कार्यरत अशा प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांस निमंत्रण दिले आहे. विद्यापीठाची सूत्रे स्वीकारल्यापासून ते आजतागायत तीन वर्षांच्या काळात खुद्द अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुलगुरूंचा फारसा सहवास लाभू शकला नाही. कामाचा व्यापच खूप. अभ्यास दौरे काय, परिषदा काय, काही विचारू नका !  अशा कारणांमुळे कुलगुरू विद्यापीठात फारसे कधी दिसतच नव्हते. अधुनमधून जेव्हा कधीतरी त्यांचे आगमन होत असे, तेव्हा नेमकं एखाद्या अफलातून शिक्षणक्रमाचे उद्घाटन आडव येई. त्यामुळे तीन वर्षांच्या कालावधीत विद्यापीठाचा अधिकारी- कर्मचारी वर्ग आणि कुलगुरूंमध्ये असे ऋणानुबंध काही केल्या निर्माण झाले नाहीत. तीन वर्षांत जे घडू शकले नाही, तो योग या सोहळ्याच्या निमित्ताने जुळून आल्याने सर्वच जण भारावले आहेत. विद्यापीठातील प्रत्येक घटकाला निमंत्रित करत कुलगुरूंनी सर्वाशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकल्याची वंदता आहे. कुलगुरूंच्या निमंत्रणाचा अव्हेर करणे अवघड असल्याने बहुतेकांनी १३ मार्च हा कामकाजातील दिवस असला तरी कशा पद्धतीने मुंबई गाठता येईल, याचे युद्धपातळीवर नियोजन सुरू केले आहे. विद्यापीठाच्या ताफ्यात चारचाकी वाहनांची काही कमतरता नाही. खुद्द कुलगुरूंच्या मुलीचे लग्न असल्याने अधिकृत सुटी न टाकताही लग्नास हजेरी लावण्याची काही जणांची तयारी आहे.
विद्यापीठाची वाहने घेऊन संयुक्तपणे सहलीची टूम काढण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. जवळपास प्रत्येकाच्या हाती निमंत्रण पत्रिका असल्याने आणि बहुतेक जण त्यात सहभागी होण्यास आतूर असल्याने त्या दिवशी विद्यापीठाचे कामकाज कितपत होईल, याबद्दल संभ्रमच आहे. विद्यापीठाचा कारभार नावाप्रमाणे मुक्त स्वरूपाचा असल्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकता असावी. यामुळेच दीड महिन्यांपूर्वी एकाचवेळी १२० जणांचा जामानिसा माऊंट अबू येथे ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘सकारात्मक विचारधारा विकसन’ शिबिरात सहभागी झाला होता. त्यावेळी विद्यापीठातील बहुतांश काम आठवडाभर विस्कळीत झाले होते. त्या शिबिराचा संबंधितांच्या कार्यशैलीत कितपत परिणाम झाला, ते मात्र स्पष्ट झालेले नाही. आता या विवाह सोहळ्यास हजेरी लावणाऱ्या इच्छुकांची लक्षणीय संख्या पाहता त्या दिवशी यापेक्षा वेगळी स्थिती राहणार नसल्याचे चित्र आहे.