ऑटो रिक्षा घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये न आणल्याने सेवक रामराव राठोड याने पत्नी कोमलचा निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत टाकला. या प्रकरणी आरोपीला जन्मठेप, तसेच इतर तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्या. एम. व्ही. यवतीकर यांनी सुनावली.
कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील आरोपी सेवक राठोड याचा विवाह लोहा तालुक्यातील काजाळातांडा येथील कोमल हिच्याशी मे २०१० मध्ये झाला होता. काही महिने दोघांचा व्यवस्थित संसार चालल्यानंतर पती राठोडने कोमल हिला रिक्षा घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावला. त्यासाठी तिचा छळ सुरू केला व त्यातूनच जिवे मारून मृतदेह विहिरीत टाकून दिला. या प्रकरणी तुकाराम गंगाराम जाधव यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात १४ जुलै २०११ रोजी तक्रार दिली.
तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तपास करून आरोपी राठोडविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्या. एम. व्ही. यवतीकर यांनी या खटल्याचा निकाल दिला. आरोपी राठोड यास जन्मठेप, त्याचा भाऊ प्रेमदास, त्याची पत्नी रेखा व नणंद कविता देविदास या तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.