देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेतंर्गत कळवण उपजिल्हा रुग्णालयाने कात टाकली असून रूग्णालयाच्या बदललेल्या रूपामुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. बी. सोनवणे, प्रशासकीय अधिकारी डॉ. ए. बी. पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपजिल्हा रुग्णालय परिसरातील स्वच्छता, परिसरातील राखीव जागेत तयार केलेले उद्यान, लहान मुलांसाठी खेळणी आदीची  व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी दगडी बाके तयार करण्यात आले आहेत. बाह्यरूग्ण
विभागाच्या दर्शनी भागात सुरक्षारक्षक, माहिती देण्यासाठी मदतनीसही आहे. बाह्य़रुग्ण विभागात टीव्हीव्दारे शासनाच्या कल्याणकारी योजनाबद्दल रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना माहिती दखविली जाते. आंतररुग्ण व बाह्य़रुग्ण परिसर हा संपूर्णपणे कर्मचाऱ्यांनी दान केलेल्या कुंडय़ा व रोपांनी सुशोभित करण्यात आला असून जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व रुग्णालय सुशोभित झाले आहे. ठिकठिकाणी ‘गुटखा व तंबाखु दानपेटी’ ही अभिनव कल्पनाही राबविण्यात आली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ गणपती मंदिर असून सुसज्ज बैठक कक्षासह मोफत रुग्णोपयोगी व मार्गदर्शनपर आरोग्यदायी पुस्तकांचे वाचनालय येथे आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे रुग्णालयास आजपर्यंत पाच वेळा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. बी. सोनवणे, प्रशासकीय अधिकारी डॉ. ए. बी. पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अलीकडेच रूग्णालयात आयोजित सर्वरोग निदान शस्त्रक्रिया व दंत अभियानातंर्गत बाह्य़ रुग्ण विभागात २०३९ रुग्ण तपासण्यात आले. १०० मोठय़ा आणि ८२ लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.