सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीसह इतर धार्मिक स्थळांचे शुद्धीकरण व साफसफाई करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी खा. हेमंत गोडसे यांनी केली आहे.
लोकसभेत या संदर्भात गोडसे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीची स्वच्छता आवश्यक आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा उगम होऊन नाशिकपासून पुढे १४६५ किलोमीटर अंतर पार करून आंध्र प्रदेशजवळ बंगालच्या खाडीत जाऊन मिळते. नाशिकपासून पुढे गोदावरीत प्रदूषण वाढतच जाते. औद्योगिक कचरा, सांडपाणी, विषारी रसायने, आदी कारणांमुळे गोदावरीचे प्रदूषण वाढून दिवसेंदिवस नदीची अवस्था बिकट होत चालली आहे. जुलैपासून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा सुरू होत आहे. कोटय़वधींच्या संख्येने भाविक यादरम्यान येथे गोदावरीत स्नान करण्यासाठी येतील, असा अंदाज आहे. भाविक पर्वणीत स्नान करून तीर्थ म्हणून नदीतील पाणी प्राशन करतात. तसेच हेच पाणी तीर्थ म्हणून घरीही नेतात. सध्याची गोदावरी नदीची स्थिती पाहता पाणी पिण्यालायक नाही. अशा स्थितीत गोदावरी नदीसह सर्व धार्मिक स्थळांचे शुद्धीकरण तथा स्वच्छता होण्याची गरज आहे. पर्यावरण व जलसंधारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोदावरी व धार्मिक स्थळे शुद्धीकरण व साफसफाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी गोडसे यांनी केली आहे.
दरम्यान, गोदावरीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यांना संस्था आणि संघटनांचीही साथ मिळत आहे. नदीपात्रातील प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांविरुद्ध तर अलीकडेच थेट फौजदारी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. गोदापात्रात कपडे धुणे, वाहन धुणे, कचरा टाकणे असे कृत्य करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. याशिवाय असे कृत्य करणाऱ्यांवर भरारी पथकही लक्ष ठेवून आहे. नियमांचे उल्लंघन करताना कोणी दिसल्यास हे पथक जागच्या जागी त्यांना दंड ठोठावत आहे. कोणी कपडे धूत असल्यास कपडे जप्त करण्यात येत आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने गोदापात्र स्वच्छता मोहीम आखून भाविकांना जलप्रदूषण कमी करण्यासंदर्भात पथनाटय़ाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. हे कार्यकर्ते स्वत: हातात झाडू घेऊन नदीपात्र परिसरात स्वच्छता करताना दिसतात. असे असले तरी स्थानिक नागरिक आणि भाविकांची नदीपात्र स्वच्छतेच्या या प्रयत्नांना योग्य साथ मिळत नसल्याने जलप्रदूषण दूर करणे प्रशासनासाठी एक आव्हान झाले आहे. रामकुंडासह इतर कुंडांमध्ये पूजाविधीचे साहित्य टाकण्यात येते. कुंडय़ांमध्ये निर्माल्य न टाकता ते थेट नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदीपात्र स्वच्छतेसाठी कितीही प्रयत्न केले तरी ते कमीच ठरत आहेत. गोदावरी नदीपात्रातील जलप्रदूषणाची व्याप्ती पाहून याआधी अनेक साधू, महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे प्रदूषण कायम असल्यास शाही स्नान होणार कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे पर्यावरणतज्ज्ञही प्रदूषणामुळे चिंतित आहेत. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनीही गोदावरीतील पाणी स्नान करण्यासाठीही धोकादायक असल्याचे म्हटले होते. तर अलीकडेच मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थासाठी अत्यंत कमी अवधी शिल्लक असल्याने या अवधीत गोदापात्र स्वच्छ करणे कठीण असल्याची कबुली दिली आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर गोडसे यांनी लोकसभेत गोदावरी नदीच्या स्वच्छतेविषयी प्रश्न उपस्थित करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
त्र्यंबकेश्वर हे एक सिंहस्थाचे महत्त्वपूर्ण ठिकाण. त्र्यंबकेश्वर शहरातील अस्वच्छता हा सतत चर्चेचा विषय ठरला आहे. एक किंवा दोन गल्ल्या सोडल्यास शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्यास वाव मिळतो.
अस्वच्छता दूर करण्यासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कठोर उपाय करण्याची गरज असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.