18 November 2017

News Flash

मी ठणठणीत आहे

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले सुप्रसिद्ध सिनेछायाचित्रकार जगदीश माळी यांनी आपली मानसिक आणि आर्थिक

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 25, 2013 12:09 PM

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले सुप्रसिद्ध सिनेछायाचित्रकार जगदीश माळी यांनी आपली मानसिक आणि आर्थिक परिस्थिती चांगली असून मी ठणठणीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. माझ्याबाबतीत प्रसार माध्यमांतून ज्या काही बातम्या पसरवल्या गेल्या त्यात काहीही तथ्य नसल्याचा दावाही माळी यांनी केला आहे. खंडाळा येथे सध्या मजेत राहतोय, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
माझ्या बाबतीत ज्या काही बातम्या प्रसार माध्यमातून येत होत्या, त्या वाचून माझी पहिली प्रतिक्रिया ‘हे सर्व हास्यास्पद’ आहे, अशी आहे. याची सुरुवात करणारी िमक हिच्याबद्दल किंवा अन्य कोणाबद्दलही माझ्या मनात राग नाही. त्यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याचा माझा विचार नाही. मानसिकदृष्टय़ा आणि आर्थिकदृष्टय़ाही मी सुस्थितीत आहे. फक्त मला मधुमेहाचा आजार आहे. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक कमी झाले तर त्याचा त्रास मला होतो.
त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो होतो. गेली तीस वर्षे माझा हा नित्यक्रम सुरू आहे. त्या दिवशीही मी बाहेर पडलो आणि काही अंतर चालून गेल्यानंतर मला एकाएकी गळून गेल्यासारखे झाले. साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे माझी तशी अवस्था झाली. साखरेचे प्रमाण पुन्हा व्यवस्थित व्हावे म्हणून मी एका दुकानात गेलो आणि चॉकलेट घेतले. चॉकलेट खाताना ते तोंडाला इकडे-तिकडे लागले. त्याच वेळी मला मिंकने पाहिले. माझी ती अवस्था पाहून पुढचे सगळे रामायण घडले असावे, असे स्पष्टीकरण माळी यांनी केले आहे.
िमक अशी का वागली मला माहिती नाही. पण तिने हे सर्व प्रसिद्धीसाठी केले असावे. मी तिला ओळखतो. वीस वर्षांपूर्वी मी तिची छायाचित्रे काढली होती. पण त्यानंतर मी तिला भेटलेलो नाही, असेही माळी यांनी सांगितले.
सध्या मी अभिनेत्री रेखा हिची छायाचित्र काढतो. बॉलीवूडमध्ये बरेच बदलले आहे. लोकांची वृत्ती बदलली आहे. सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी भरपूर पैसे खर्च केले जातात. परंतु, छायाचित्रकारांना मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. त्यामुळे प्रॉडक्शनचे काम कमी केले आहे. काही लोकांनी मुद्दाम बोलावले तर नक्कीच काम करतो. तंत्रज्ञान, संगणक आणि डिजिटल फोटोग्राफीच्या तंत्रामुळे छायाचित्रे काढण्याची गंमत, त्यातली कला लोप पावत चालली आहे, अशी खंतही जगदीश माळी यांनी व्यक्त केली. संगणकामुळे फोटोशॉप प्रणालीमध्ये छायाचित्रांवर विविध प्रकारचे काम करता येते, हवा तसा परिणाम मिळू शकतो. परंतु, त्यामुळे छायाचित्र काढण्यातील गंमत निघून गेली आहे, असेही ते म्हणाले.

First Published on January 25, 2013 12:09 pm

Web Title: i am all right