05 June 2020

News Flash

यशाची चव आता कुठे चाखायला मिळते आहे..

त्याने काहीही केले तरी लोकांना ते आवडते. त्याची प्रेमप्रकरणे, त्याची सततची तू तू मैं मैं, अगदी त्याचा मुजोरपणा, लहरीपणा लोकांनी पाहिला आहे. तरीही तो कलाकार

| December 2, 2012 02:07 am

त्याने काहीही केले तरी लोकांना ते आवडते. त्याची प्रेमप्रकरणे, त्याची सततची तू तू मैं मैं, अगदी त्याचा मुजोरपणा, लहरीपणा लोकांनी पाहिला आहे. तरीही तो कलाकार म्हणून जितका लोकप्रिय आहे तितकाच तो लोकांचा आवडता माणूस आहे. त्याच्या मनात येईल ते तो करतो, त्याला हवं तसं तो वागतो, कोणाचीही भीड न बाळगता तो हे सर्व करतो. तो पडद्यावर जसा दिसतो तसाच तो एरव्हीही मनमौजी दिसतो म्हणून त्याच्याबद्दल अनेकांना सुप्त आकर्षण आहे. त्याच्या चित्रपटातील चुलबुल पांडेप्रमाणे तो खरोखरच ‘दबंग’ आहे, असं आपल्यालाही वाटतं, पण त्याच्याच तोंडून जेव्हा ’लोगों के साथ काम करते वक्त शराफत के दायरे में रहकर काम करना पडता है…’ असं ऐकायला मिळतं तेव्हा अनुभवातून आलेला त्याचा शहाणपणा बोलका झाला आहे हे जाणवल्याशिवाय राहत नाही. कलाकारांच्या ‘वीक पॉइण्ट’विषयी जाणून घेणाऱ्या या सदरात अनेकांचा वीक पॉइण्ट ठरलेल्या सलमान खानशी मारलेल्या गप्पा..
‘दबंग’ला मिळालेल्या यशाबद्दल तुला काय वाटतं?
‘दबंग’ हा चित्रपट एवढा हिट होईल, अशी कल्पना आम्हीही केली नव्हती, पण त्या चित्रपटाची पटकथा खरोखरच दमदार होती आणि तरीही ती पटकथा तीन-चार मोठय़ा प्रॉडक्शन हाऊसेसकडे पडून होती. त्यानंतर ती आमच्या हाती लागली, आम्हाला ती आवडली आणि आम्ही चित्रपट केल्यानंतर मग अरे, हे काय नवल घडलं, अशा प्रकारची चर्चा इंडस्ट्रीत सुरू झाली.
‘दबंग’ चित्रपटाच्या एकूणच कथेत, मांडणीवर सत्तर ते ऐंशीच्या दशकातील देशी चित्रपटांचा प्रभाव दिसून येतो..
मला हे मुळीच मान्य नाही. सत्तर ते ऐंशीच्या दशकातील चित्रपट हे प्रचलित कथांवर आधारलेले होते. त्यात एक नायक, एक नायिका आणि एक खलनायक असा सोपा फॉम्र्युला होता, नाही तर मग दोन सामथ्र्यशील घराणे, त्यांच्यातील युद्ध आणि मग त्यांच्याच पुढच्या पिढय़ांमध्ये जमलेले प्रेम अशा ठरावीक साचेबद्ध कथानकातील हे चित्रपट होते. ‘दबंग’ची कथा आणि त्यातील व्यक्तिरेखा या आजच्या काळातीलच आहेत. दुसरं म्हणजे सिनेमा हा नेहमीच बदलत असतो. म्हणून इथे प्रेमकथा तीच असली तरी ‘मैने प्यार किया’ येतो, त्यानंतर ‘कुछ कुछ होता है’ येतो.. त्या त्या काळात चित्रपटाची मांडणी, संदर्भ हे बदललेलेच असतात. ‘दबंग’चं कथानक हेही मसाला चित्रपटाचंच आहे, त्यात अजून हवी तशी गंभीरता आलेली नाही. या चित्रपटाचा नायक चुलबुल पांडे हा भ्रष्ट पोलीस अधिकारी आहे तरी त्याच्या वृत्तीत कुठे तरी सच्चेपणा दडलेला आहे म्हणून तो लोकप्रिय झाला आहे; पण खरं सांगायचं तर हा चित्रपट अजूनही मनोरंजनाच्या पातळीवरच घडतो. त्यामुळे अशा चित्रपटांची शैलीही फार काळ टिकणारी नाही.
अरबाझचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे. त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करतानाचा अनुभव कसा होता?
अरबाझबरोबर मी कलाकार म्हणून एकत्र काम केलेलं आहे. दिग्दर्शक म्हणून त्याच्याबरोबर काम करताना एक मनमोकळं वातावरण होतं. कोणतीही सूचना करावीशी वाटली तर अडचण नव्हती. कित्येकदा काय होतं, मोठमोठय़ा निर्माता-दिग्दर्शकांबरोबर काम करताना तुम्हाला एखादी गोष्ट सुचवायची असेल तर ती मोकळेपणाने सांगता येत नाही, एखादी गोष्ट पटत नसली तरी ती करावी लागते. त्यांच्याबरोबर वाद घालून चालत नाही. नाही तर तुमचे संबंध बिघडतात आणि त्याचे पडसाद दीर्घकाळ तुमच्या कामावर उमटत असतात. त्यामुळे इतरांबरोबर काम करताना सभ्यतेच्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. अरबाझ माझा भाऊ असल्याने ती अडचण नव्हती, कारण भावाभावांत भांडणं नेहमीच होत असतात. कधी तो बरोबर असतो, कधी मी बरोबर असतो. दोघेही आपापल्या मतांवर ठाम असतो तेव्हा मग आमचा वाद निवाडय़ासाठी वडिलांकडे जाऊन पोहोचतो; पण या वादातून चित्रपटासाठी काय योग्य आहे तेच आमच्या हातात येतं. त्यामुळे हे वाद चांगल्यासाठीच असतात. दिग्दर्शक म्हणून अरबाझचा हा पहिलाच चित्रपट असला तरी त्याच्या सूचना, कामाची पद्धत अफलातून होती. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हा खूपच चांगला होता.
‘दबंग २’च्या कथेत काय वेगळेपणा आहे?
‘दबंग २’ची कथा ही वेगळी आहे, कारण आता पांडेजी स्थिरस्थावर झाले आहेत. त्यांचे सावत्र पिता, भाऊ  मख्खी, त्याची पत्नी असा आता त्यांचा मोठा परिवार झाला आहे. शिवाय, पांडेजींना स्वत:लाही मुलगा झाला आहे. त्यामुळे विवाहानंतर त्यांचा रोमान्स आणि या एकत्र आलेल्या कुटुंबाला पुढे घेऊन जाताना होणारी कसरत, काही वेगळी आव्हानं असा पूर्णत: वेगळा चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल.
तुला दोनशे कोटींचा नायक म्हटलं जातं..
छे. छे.. तसं काहीच नसतं. मीसुद्धा याआधी अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
माझ्यावर फ्लॉपचा शिक्का बसला होताच की.. आज माझे चित्रपट चांगले चालले आहेत त्यामुळे जरा बरी परिस्थिती आहे आणि तुम्ही शंभर कोटी मिळाले, दोनशे कोटी मिळाले, अशी चर्चा करता, प्रत्यक्षात आमच्या कुठल्याही चित्रपटाला आजवर एवढा पैसा मिळालेला नाही. उलट निर्माता म्हणून जेव्हा चित्रपटाची आर्थिक गणितं आम्ही करतो तेव्हा पदरात नुकसानच पडलेलं असतं. आत्तापर्यंत माझ्या भावांनी ‘हॅलो ब्रदर’, ‘प्यार किया तो डरना क्या’ असे किती चित्रपट केले आहेत, पण एक ‘दबंग’ वगळता कुठल्याही चित्रपटाने निर्माता म्हणून आम्हाला नफा मिळवून दिलेला नाही. मला विचाराल तर तुमचा निर्मितीचा खर्च वसूल झाला, ज्यांनी ज्यांनी तुमच्या चित्रपटात पैसै गुंतवले होते त्यांना त्यांचे पैसे परत देता आले म्हणजे तुमचा चित्रपट चांगला चालला, एवढंच साधं गणित आहे.
तुझ्या स्टाइलची, नृत्याची भरपूर चर्चा होते..
जे साधंसोपं आहे ते मी करतो आणि म्हणूनच लोकांना ते आवडतं. माझ्यापेक्षा हृतिक रोशन एक उत्तम नर्तक आहे, पण तो जसं नाचतो तसं लोकांना नाचणं शक्य होत नाही, पण तरीही मी जे काही करतो ती स्टाइलही फार काळ टिकणारी नाही. मला ज्या काही स्टाइल्स करायच्या होत्या त्या आत्तापर्यंत मी करून घेतल्या. त्यात आता नावीन्य काही उरलेलं नाही.
आता तोचतोचपणा यायला लागला आहे. त्यामुळे फार तर पुढचं वर्षभर या गोष्टी टिकतील. नंतर मात्र मला काही तरी वेगळं करावंच लागेल, हेही तितकंच खरं आहे.
‘दबंग ३’ काढणार का?
‘दबंग ३’ काढायचाच आहे आणि तोही एका वेगळ्या कल्पनेवर करायचा आहे. त्याची तयारीही आम्ही सुरू केली आहे, पण ‘दबंग ३’साठी ‘दबंग २’ लोकांना आवडणं खूप महत्त्वाचं आहे. चुलबुल पांडेचा दुसरा अध्यायही लोकांना पहिल्याइतकाच आवडला तर तिसरा अध्यायही धमाकेदार असेल, यात शंका नाही. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2012 2:07 am

Web Title: i am testing the success now
Next Stories
1 मराठी चित्रपटांची परदेशवारी कधी?
2 नाट्यरंग : ‘एका लग्नानंतरचे घोस्ट’
3 पाडगावकरांचे ‘जीवनगाणे’ रसिकांच्या भेटीला!
Just Now!
X