मी राष्ट्रपती होण्यापूर्वी शिक्षक होतो. तेव्हा मी २०२० मध्ये भारत कसा असावा याचे स्वप्न पाहिले होते. राष्ट्रपतिपदापेक्षा शिक्षक बनून विद्यार्थी व युवकांमध्ये देशविकासाची प्रेरणा रुजवणे मला अधिक योग्य वाटले. त्यामुळे मला पुन्हा राष्ट्रपती होण्यात स्वारस्य नव्हते, असे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आज येथे सांगितले.
पालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या कै. अण्णासाहेब शिंदे स्मृती व्याख्यानमालेत भाषण केल्यानंतर थत्ते मैदानावर माजी राष्ट्रपती कलाम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एका विद्यार्थ्यांने तुमची राष्ट्रपतिपदाची मुदत संपल्यानंतर राष्ट्रपती भवनातून तुमचे बि-हाड एका मोटारीत गेले. पण तुमच्यानंतरच्या राष्ट्रपतींचे बि-हाड १८ मोटारीतून गेले, असा प्रश्न विचारला होता. पण कलाम यांना सदोष ध्वनियोजनेमुळे तुम्ही दुस-यांदा राष्ट्रपती का झाला नाहीत, असा प्रश्न असावा असे वाटले. त्यामुळे त्यांनी वरील उत्तर दिले. तुम्ही वयाच्या ८० व्या वर्षी तरुणांसारखे लांब केस का ठेवता, असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने केला असता डॉ. कलाम म्हणाले, गेल्या १० वर्षांत मी दीड कोटी तरुणांना भेटलो आहे. मला सतत तरुणांमध्ये राहायला आवडते, त्यामुळे त्याचा हा परिणाम असावा.
आजची शिक्षण पद्धती आम्हाला पैसा कमवायला शिकवते, परंतु चांगले जीवन जगायला शिकवत नाही यावर कलाम म्हणाले, शिक्षकाने सतत ज्ञानाचे उत्सर्जन करत राहावे. असे शिक्षक असतील तर शिक्षणाचा भर पैसे कमावण्यावर राहणार नाही. असे शिक्षक विद्यार्थ्यांना व्यावसायिक न बनवता ज्ञानार्थी बनवतील. पालकांना आज असे वाटते, आपला मुलगा हा शेजा-यांच्या मुलासारखा झाला पाहिजे, तर शिक्षकांना वाटते सर्व विद्यार्थी पहिल्या पाचातल्या विद्यार्थ्यांसारखे झाले पाहिजे, परंतु विद्यार्थ्यांना काय वाटते याचा विचार केला जात नाही. प्रत्येक विद्यार्थी हा असाधारण असतो. त्याने स्वत:च स्वयंप्रकाशित झाले पाहिजे. विजेचा दिवा पाहिल्यावर थॉमस एडिसन आठवतो. टेलिफोन पाहिल्यावर ग्रॅहॅम बेल आठवतो. गुरुत्वाकर्षण म्हटले की न्यूटन आठवतो. तसे आपलेही नाव भावी पिढय़ांनी घेतले पाहिजे, यासाठी आपण स्वतंत्र निर्मिती केली पाहिजे. आपण इतरांचे अनुकरण करीत राहिलो तर तुमचे नाव कुणालाही आठवणार नाही, तुम्ही ज्याचे अनुकरण करता त्यांचेच नाव कायम राहील. याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन डॉ. कलाम यांनी केले.
ज्ञान व आत्मविश्वासावरची एक कविता त्यांनी विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली. येत्या वर्षभरात मी पाच झाडे लावून त्याचे रक्षण करील, समाजात, कुटुंबात भ्रष्टाचार वाढणार नाही, याच्यावरही मी लक्ष ठेवीन. पालक भ्रष्टाचार करीत असेल तर तोही मी रोखील, अशी प्रतिज्ञा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार जयंत ससाणे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे, नगराध्यक्ष राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष मुजफ्फर शेख, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी आदी उपस्थित होते.