मुंबई-ठाण्यात वाढलेल्या काँक्रीटच्या जंगलात फुलपाखरे दिसणे दुर्लभ झाले असले तरी अजूनही या प्रदेशात फुलपाखरांच्या तब्बल १६५ जाती आढळतात. वन्यजीव छायाचित्रकार युवराज गुर्जर यांनी नुकत्याच विकसित केलेल्या ‘आय लव्ह बटरफ्लाय’ या अ‍ॅपद्वारे मोबाइलवर त्यापैकी १५३ प्रकारच्या फुलपाखरांची सचित्र माहिती विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. अवघ्या १५ दिवसांत सहाशेहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केले असून लवकरच दुसऱ्या भागात महाराष्ट्रात ठिकठिकाणी आढळणाऱ्या आणखी २५० जातींच्या फुलपाखरांची सचित्र माहितीही दिली जाईल, अशी माहिती युवराज गुर्जर यांनी दिली. 

हल्ली शहरातील अनेक जण हौसेने निसर्ग निरीक्षणासाठी जातात. तेथील वनस्पती, पशू-पक्ष्यांचे निरीक्षण करतात. मात्र प्रत्येक समूहासोबत तज्ज्ञ व्यक्ती असतेच असे नाही. त्यामुळे आपल्याला दिसलेल्या पक्ष्याचे अथवा फुलपाखराचे नाव काय, ते कोणत्या जातीचे हे त्यांना समजत नाही. त्यामुळे काहीजण पुस्तके घेऊन निसर्ग निरीक्षणासाठी बाहेर पडतात. मात्र डोंगर-दऱ्यांतून पुस्तकांचे ओझे वाहणे कठीणच असते. निसर्ग निरीक्षणाचा हा द्रावीडी प्राणायाम सोपा व्हावा म्हणून फुलपाखरांची माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारे देण्याची कल्पना युवराज गुर्जर यांना सुचली. पहिल्या प्रकल्पात त्यांनी फक्त मुंबई-ठाण्यात आढळणाऱ्या फुलपाखरांची माहिती देण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने कामही सुरू केले. मात्र हे अ‍ॅप विकसित करण्यासाठी साधारण ६० हजार ते एक लाख दहा हजार रुपये खर्च येणार होता. मुंबईतील एक्झोनंट या सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या कंपनीने त्यासाठी मदत केल्याने निसर्गप्रेमींना हे अ‍ॅप विनामूल्य उपलब्ध करून देता आल्याचे युवराज गुर्जर यांनी सांगितले.
नियमित निसर्ग निरीक्षण करणाऱ्यांना हे अ‍ॅप उपयोगी आहेच, शिवाय हौशी तसेच नवख्यांसाठीही मार्गदर्शक म्हणून त्याची मदत होऊ शकेल. त्यासाठी सात रंगांचे पर्याय अ‍ॅपमध्ये देण्यात आले आहेत. विशिष्ट रंगाचे फुलपाखरू दिसल्यास रंगांचा पर्याय निवडून निसर्गप्रेमींना आपण पाहिलेल्या फुलपाखराचे नाव तसेच जात, माहिती करून घेणे सोपे होईल. गुगल प्ले स्टोअरमध्ये ‘आय लव्ह बटरफ्लाय’ या नावाने हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध असून ते विनामूल्य डाऊनलोड करता येते.