आगामी लोकसभा निवडणूक शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण माढा मतदारसंघातून लढविणार असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भुईसपाट करण्यासाठी आसुसलेली जनता आपणास लोकसभेत निश्चित पाठविल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माढा मतदारसंघातील सामान्य जनतेचा भ्रमनिरास केला असून विशेषत: मागील सलग दोन वर्षांत पडलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत पवारांनी माढा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कुचेष्टाच केल्याचा आरोप खोत यांनी केला. आता पवार हे लोकसभेत जाण्यास उत्सुक नसल्याचे वारंवार सांगत असले तरी त्यांनी माढा मतदारसंघातून उभे राहून दाखवावे म्हणजे पराभव काय असतो, हे त्यांना कळून चुकेल, असा टोमणाही खोत यांनी मारला.
करमाळा तालुक्यातील केत्तूर स्टेशन येथे आयोजित ऊस परिषदेत बोलताना खोत यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेर टीका केली. या वेळी व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जयंत बगाडे, तालुकाध्यक्ष महेश चिवटे, महादेव चौधरी, विवेक येवले, सुभाष परदेशी आदी उपस्थित होते. संघटनेचे शाखाध्यक्ष हनुमंतराव राऊत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
खोत म्हणाले, की साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होतानाच साखरेचे भाव पाडले जातात व या कमी दरावर उसाचा दर ठरवून नंतर पुन्हा साखरेचे वाढविले जातात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. देशातील शेतकऱ्यांनी भरघोस साखर उत्पादन केल्यामुळे केंद्र शासनाला दुख झाले आहे. आयात साखर बंद केली तर देशातील साखरेचे भाव प्रति किलो ३५ रुपयांपर्यंत जातील आणि उसाला ३५०० रुपये प्रतिटन भाव मिळेल. मात्र केंद्रसरकार साखरेची आयात बंद करण्यास तयार नाही. देशात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असल्याने या दोन्ही पक्षांचे साखरसम्राट त्याबाबत पाठपुरावा करीत नाहीत. गतवर्षीपेक्षा यंदा खते, वीज, मजुरी, इंधन, बेणे या खर्चात सुमारे ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असताना त्यानुसार उसाला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन हाती घेतल्याचे खोत यांनी सांगितले.
या वेळी बोलताना संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे यांनी करमाळा तालुक्यातील साखर कारखानदारांकडून होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. आदीनाथ साखर कारखान्याकडे ७३ कोटींची साखर शिल्लक असून त्यावर ६१ कोटींचे कर्ज आहे. साखरेतून बारा कोटींची रक्कम सभासदांना देण्यासाठी उपलब्ध होऊन दिवाळीला प्रतिटन २०० रुपयेप्रमाणे हप्ता निघू शकतो. मात्र कोणतीही बँक आदीनाथ साखर कारखान्याला कर्ज देण्यास तयार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या वेळी प्रा. जयंत बगाडे, बाळासाहेब गायकवाड, विवेक येवले आदींची भाषणे झाली. अॅड. अजित विघ्ने यांनी सूत्रसंचालन केले.