इचलकरंजीकरांना सतावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या आणि मुदत संपलेल्या ५७ दुकानगाळ्यांच्या फेर लिलावाची प्रक्रिया या दोन विषयावरून गुरुवारची नगरपालिकेची विशेष सभा चांगलीच गाजली. सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये सातत्याने शाब्दिक खडाजंगी होत राहिली. दुकान गाळ्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पंच समिती नेमण्याचा ठराव सत्तारूढ गटाने बहुमताच्या जोरावर मंजूर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर होत्या.
विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी गुरुवारी इचलकरंजी नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी शहर विकास आघाडीने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आणि पालिका सभागृहाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची लक्षवेधी सूचना मांडली. नगराध्यक्षांनी लक्षवेधी सूचना दाखल करून घेतली नाही.    शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, प्रमोद पाटील, सयाजी चव्हाण यांनी पाणी प्रश्नावर चर्चा करण्याचा आग्रह धरला. शहरातील पाणीटंचाई, अनियमित पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर नगराध्यक्षा गोंदकर यांनी महिनाभरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
नगरपालिकेच्या मालकीचे राजाराम स्टेडियम व आण्णा रामगोंडा पाटील शाळेजवळील भाजी मार्केटमध्ये दुकानगाळे आहेत. त्यातील ५७ गाळ्यांची मुदत संपली असून त्याची फेर लिलावाची प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. हा विषय सभेवेळी उपस्थित करण्यात आला.  सत्तारूढ गटाकडून दुकान गाळ्यांची अनामत रक्कमव भाडे ठरविण्यासाठी नगराध्यक्षा गोंदकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी आमदार अशोक जांभळे, संभाजी काटकर व रवी रजपुते या पाच नगरसेवकांची समिती नेमण्याचा ठराव मांडला. त्यास विरोधकांनी विरोध केला. त्यावर मत नोंदविताना मुख्याधिकारी नितीन देसाई यांनी असा ठराव सभेत मांडता येत नाही, असे स्पष्ट केले. त्यावरून दोन्ही बाजूंनी शाब्दिक वाद रंगला. अखेरीस सत्तारूढ गटाने हा ठराव मतदानाला टाकला. पण शहर विकास आघाडीने त्यावर मतदान केले नाही. सत्तारूढ गटाने हा ठराव बहुमताने मंजूर केला.
त्यानंतर विषयपत्रिकेवरील वाचन झाले. पालिकेच्या शाहू हायस्कूलमधील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी जाहीर केला. सभेतील चर्चेत उपनगराध्यक्ष कलागते, पक्षप्रतोद सुनिल पाटील, रवींद्र माने, रवी रजपुते, सुनिता मोरबाळे, माधुरी चव्हाण तर विरोधकांच्या वतीने जयवंत लायकर, तानाजी पोवार, महादेव गौड यांनी भाग घेतला.