सापांच्या विषाची होणारी तस्करी आणि त्यातून होणाऱ्या कोटय़वधींच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी आता नागपूर विभागातील सर्पमित्रांना वन विभागातर्फे ओळखपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. वन विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे अवैध सर्पमित्रांच्या कृत्याला आणि सापाच्या विषाच्या तस्करीलाही आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर विभागातच नव्हे तर देशभरात अवैध सर्पमित्र आणि त्यांच्या कारवायांचा सुळसुळाट झाला आहे. नागपूरमध्ये दोन वर्षांपूर्वी सुमारे कोटी रुपयाचे विष जप्त करण्यात आले आणि हा व्यवहार करणाऱ्या टोळीला वन विभागाने अटक केली. त्यापूर्वी आणि त्यानंतरही असे अनेक प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे या सर्पमित्रांच्या कृत्याला आळा घालणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान होते. एकटय़ा नागपुरात ५०० हून अधिक सर्पमित्रांची संख्या आहे. सापांचे खेळ दाखवणे व त्यातून पैसा कमविणे, तसेच शहरात निवासस्थान, कार्यालय, प्रतिष्ठानांमध्ये साप निघाल्यास पकडायला जाणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे असा व्यवहार सुरू होता. या सर्व व्यवहाराला प्रतिबंध घालण्यासाठी सर्पमित्रांना ओळखपत्र देण्याचा निर्णय वन विभागाने घेतला.
 नागपूर वन विभागाने त्यादृष्टीने पहिले पाऊल उचलले आणि सर्पमित्रांकडून अर्ज मागविण्यात आले. साप पकडण्याचा अनुभव व शास्त्रोक्त ज्ञान, सापाच्या प्रजातींविषयी माहिती तसेच विषारी व बिनविषारी सापांच्या गुणधर्माबद्दलची माहिती, सापाने चावा घेतल्यास करावयाचे प्राथमिक उपचार, साप पकडणे व साप हाताळण्याचा पाच वषार्ंचा अनुभव, आयुर्विमा असणे अनिवार्य ही पात्रता ओळखपत्रांसाठी ठेवण्यात आली होती. त्यानुसार जुलै २०१३ मध्ये अर्ज मागविण्यात आले. त्यावेळी शहरातील सुमारे ४८ सर्पमित्रांनी ओळखपत्रासाठी अर्ज सादर केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या निर्देशानुसार त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. ऑगस्ट २०१३ मध्ये या समितीच्या सदस्यांची बैठक झाली. कागदपत्रांच्या तपासणीनंतर २६ सर्पमित्रांना तेव्हाच नकार देण्यात आला. उर्वरित २२ सर्पमित्रांची यादी वन विभागाला सादर करण्यात आली. त्यानंतर ओळखपत्राचे हे प्रकरण थंडबस्त्यात गेले. एस.जी. टेंभूर्णीकर यांनी मुख्य वनसंरक्षक पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पुन्हा त्यांनी हे प्रकरण बाहेर काढले. अलीकडेच या २२ सर्पमित्रांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातील १२ सर्पमित्रांकडे विमा नसल्यामुळे त्यांनाही ओळखपत्राच्या यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत आता फक्त १० सर्पमित्रांनाच ओळखपत्र देण्याचा निर्णय नागपूर विभागाने घेतला आहे.