News Flash

कलाकरांचा “आयडेण्टिटी क्रायसिस”

मराठी किंवा हिंदी मालिकांमधील कलाकारांमध्ये सध्या ‘आयडेण्टिटी क्रायसिस’ निर्माण झाला आहे. वाहिन्यांची काही धोरणे या समस्येला जबाबदार आहेत.

| October 14, 2012 09:21 am

मराठी किंवा हिंदी मालिकांमधील कलाकारांमध्ये सध्या ‘आयडेण्टिटी क्रायसिस’ निर्माण झाला आहे. वाहिन्यांची काही धोरणे या समस्येला जबाबदार आहेत. मालिकांनंतर दाखवण्यात येणारी श्रेयनामावली या ‘आयडेण्टिटी क्रायसिस’च्या मुळाशी आहे. श्रेयनामावलीतून कलाकारांची नावे गायब झाल्याने आज सर्वसामान्य प्रेक्षकांमध्येच नाही, तर या क्षेत्रातही एखादा कलाकार त्याच्या खऱ्या नावाने नव्हे, तर मालिकेतील नावाने ओळखला जाऊ लागला आहे. ही गोष्ट इतक्यावरच थांबत नाही, तर अनेकदा ‘प्रमोशन’च्या नावाखाली या कलाकारांना मालिकेतील त्यांच्या भूमिकेच्या स्वरूपातच लोकांसमोर आणले जाते. यामुळे प्रेक्षकांना नवख्या कलाकारांची नावानिशी ओळख होतच नाही. एखाद्या कलाकाराचा चेहरा घराघरांत पोहोचला, तरी त्याची ओळख मात्र तो करत असलेल्या भूमिकेपुरतीच मर्यादित राहते. तर अनेक नवीन प्रेक्षकांना काही जुन्या कलाकारांची नावेही कळत नाहीत. मालिकेच्या आगेमागे येणाऱ्या श्रेयनामावलीत छायाचित्रणकार, दिग्दर्शकापासून ते अगदी प्रकाशयोजनाकारापर्यंत सगळ्यांचीच नावे येतात. मात्र छोटय़ा पडद्यावर भूमिका साकारणारा कलाकार मात्र श्रेयनामावलीपासून वंचित राहतो. हा कलाकारांवर अन्याय आहे का, कलाकारांना याबाबत काय वाटते, वाहिन्यांनी या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे का, असल्यास तो कसा करावा, याबाबत कलाकारांनीच मांडलेली काही मते..

काही भाग तरी नावे हवीच!
कलाकाराने स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी श्रेयनामावलीवर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नाही. कारण श्रेयनामावली द्यावी की नाही, हे अखेर वाहिनीच्या हातात असते. मात्र चांगले काम केल्यास आणि चांगल्या मालिका निवडल्यास कलाकाराचे नाव आपोआपच प्रसिद्धीच्या झोतात येते. कलाकाराचा चेहरा प्रसिद्ध झाला की, त्याच्या नावाची विचारणा सगळीकडूनच होत असते. तरीही नवोदित कलाकारांना उत्तेजन मिळावे आणि त्यांचे नाव सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी सुरुवातीचे काही भाग तरी श्रेयनामावलीत नाव हवेच. आता तर काही भागांनंतर मालिकेचे शीर्षकगीतही बंद केले जाते. त्यामुळे श्रेयनामावलीवर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नाही.
– अंगद म्हसकर

पूर्वी होते, ते आता का नाही?
पूर्वी मालिका सुरू होताना लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, दिग्दर्शक वगैरे सर्व तंत्रज्ञांची नावे यायची. तर मालिका संपताना सर्व कलाकारांची नावे झळकायची. मात्र काही वर्षांपासून एक मालिका संपताच लगेच दुसऱ्या मालिकेतील मागच्या भागातील काही दृष्ये दाखवून ती पुढे सुरू केली जाते, त्यामुळे कलाकारांची नावे श्रेयनामावलीतून हद्दपार झाली आहेत. मात्र हे चूक आहे. असे होता कामा नये. कलाकाराचे श्रेय त्या भूमिकेतील पात्राला न मिळता ते पात्र जिवंत करणाऱ्या कलाकाराला मिळायला हवे. याबाबत वाहिनी आणि निर्मात्यांनीही विचार करायला हवा.
– चिन्मय मांडलेकर

सर्वच कलाकारांनी एकत्र यायला हवं
श्रेयनामावलीत कलाकारांचे नाव येत नाही, हा कलाकारांवर अन्यायच आहे. हे म्हणजे आमची ओळख मालिकेने आणि वाहिनीने नाकारण्यासारखे आहे. या प्रश्नावर सर्वच कलाकारांनी एकत्र येण्याची गरज आहे. कलाकार एकत्र आले आणि त्यांनी श्रेयनामावलीची मागणी केली, तरच कदाचित न्याय मिळेल.     
– मयूर खांडके

तंत्रज्ञांचे नाव देता, मग आमचे का नाही?
अनेक वेळा आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना ‘अमुक मालिकेतील अमुक..’ असेच ओळखले जाते. ती प्रसिद्धी त्या मालिकेतील त्या विशिष्ट पात्राला आणि मालिकेला मिळते. पण आम्हाला प्रसिद्धी कधी मिळणार? अनेकदा आमच्या सहकलाकारांनाही सुरुवातीला आम्ही त्यांच्या इतर गाजलेल्या भूमिकांच्या नावाने ओळखतो. कलाकारांचीच ही अवस्था आहे, मग इतर प्रेक्षकांना तर आमची नावे माहिती असण्याची शक्यता शून्य! अनेक मोठय़ा कलाकारांनी ‘रिअ‍ॅलिटी शो’ केल्यानंतरच त्यांची नावे प्रेक्षकांना कळली. मग आपल्या नावाने प्रसिद्ध होण्यासाठी ‘रिअ‍ॅलिटी शो’ किंवा सूत्रसंचालनाशिवाय पर्याय नाही का? आजही मालिकेनंतर किंवा मालिकेआधी श्रेयनामावलीचा पट्टा दूरचित्रवाणीवरून सरकतो. पण त्यात तंत्रज्ञांची नावे असतात. त्यांच्या जोडीला आमचीही नावे गेली, तर कुठे बिघडतं?
– योगिनी चौक

नाव ही तर ओळख आहे
श्रेयनामावलीतून कलाकार हद्दपार झाल्याचा फटका नवोदितांना बसतो, तसा तो अगदी जुन्या-जाणत्या कलाकारांनाही बसतो. अनेकदा नव्या प्रेक्षकांना जुने कलाकार माहीत नसतात. श्रेयनामावलीत नाव न देणे, हा खूपच उथळ दृष्टिकोन आहे. लहान-मोठय़ा कलाकारांची नावे त्यात आलीच पाहिजेत. ‘पुढे पाहा..’ किंवा ‘विश्रांतीनंतर..’ अशा नावांखाली पुढे काय घडणार, हे दाखविण्यापेक्षा त्या वेळेत कलाकारांची नावे दाखवली जाऊ शकतात. त्यामुळे वेळ नाही, हे वाहिन्यांचे कारण चूक आणि निखालस खोटे आहे. एखादी मालिका चालण्यासाठी एखाद्या कलाकाराला भूमिकेच्या नावाने ओळखायला हवे, हे ठीक आहे. मात्र त्यासाठी त्याचे श्रेय हरपण्याची काहीच गरज नाही. मात्र मालिकेमधील कलाकारांमध्ये किती ऐक्य आहे, यावर या प्रश्नाची तड लागणार की नाही, हे अवलंबून आहे.
– मधुरा वेलणकर

हे तर आमचे नुकसानच!
एखाद्या मालिकेच्या शेवटी माझे नाव दिसत नसेल, तर ते माझे व्यक्तिगत नुकसानच म्हणायला हवे. लोकांना आमचा चेहरादेखील मालिका सुरू असेपर्यंतच लक्षात राहतो आणि भूमिकेचे नाव आमच्या चेहऱ्याला चिकटते. ‘कालाय तस्मै नम:’ या मालिकेत काम करीत असताना मला सगळे विक्रम गोखलेंचा नातू म्हणूनच ओळखायचे. विक्रम गोखले, तुषार दळवी किंवा यांच्यासारखे सगळेच दिग्गज याआधी नाटय़, चित्रपट आणि मालिका या सर्वच क्षेत्रांत वावरले असल्याने त्यांचे नाव प्रेक्षकांना माहीत आहे. मात्र आमच्यासारख्या मालिकेत काम करणाऱ्या नवख्या कलाकारांना नाव सिद्ध करण्यासाठी श्रेयनामावलीचाच आधार असतो.
– शशांक केतकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2012 9:21 am

Web Title: identity crisis actors marathi serials hindi tv serials
टॅग : Marathi Serials
Next Stories
1 नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता ९९९ नवभक्ती नवरंग नवरात्री’ स्पर्धा
2 मराठी सिनेमा क्रांतीच्या उंबरठय़ावर!!
3 चित्रगीत : श्रीसिद्धिविनायक महाआरती व आदि गणेश
Just Now!
X