शेतक-यांच्या पीक विम्याशी जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेचा काडीचाही संबंध नसताना  बँकेने फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, संचालकांनी आपली राजकीय सोय व प्रसिद्धीसाठी, आपणच शेतक-यांना विम्याची रक्कम दिल्याच्या आविर्भावात सुरू केलेले कार्यक्रम रद्द करावेत, अन्यथा राज्य सरकारला वेगळे धोरण स्वीकारावे लागेल, असा स्पष्ट इशारा कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज दिला.
विखे आज नगरमध्ये होते. सरकारी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. फुकटचे राजकीय श्रेय लाटण्याचा हा प्रकार केवळ नगरमध्येच होत आहे, राज्यात इतर ठिकाणी असे प्रकार निदर्शनास आले नाहीत, त्यामुळे आपण बँकेच्या अध्यक्षांना दूरध्वनी करून कल्पना दिली, असेही विखे म्हणाले. पीक विम्याची रक्कम जिल्हा बँकेप्रमाणेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही शेतक-यांच्या खात्यावर सरकार जमा करते, परंतु राष्ट्रीयीकृत बँका असे प्रसिद्धीचे धंदे करत नाहीत, याकडे विखे यांनी लक्ष वेधले.
पीक विमा व जिल्हा बँक यांचा काही संबंध नाही, शेतकरी हितासाठी विम्यामध्ये सरकारने भागीदारी केली आहे, ही रक्कम सरकारी आहे, त्याचा बँकेशी काय संबंध, विमा उतरवण्यासाठीही बँकेचे संचालक कोणाच्या दारात गेले नव्हते, परंतु बँकेचे काही पदाधिकारी आपल्याच आदेशाने विम्याचे वाटप होते आहे, अशा आविर्भावात कार्यक्रम करत आहेत, आपल्या राजकीय सोय व प्रसिद्धीसाठी त्यांनी सुरू केलेले हे धंदे त्वरित थांबवावेत, असे विखे म्हणाले.
जिल्हा बँकेने दुष्काळात शेतक-यांना काही मदत केली नाही, कर्ज व्याजात सवलत, वीजबिलात सवलत असे शेतक-यांना मदत करणारे कार्यक्रम बँकेला राबवता आले असते, असे उपक्रम राबवले असते तर सरकारने त्याचे स्वागतच केले असते. परंतु सरकारने शेतक-यांना दिलेली पीक विम्याच्या रकमेतून घरबसल्या वसुली करण्याचा व स्वत:ची पाठ थोपटून घेऊन, स्वत:चेच अभिनंदन करण्याचे हास्यास्पद प्रकार बंद करावेत, अन्यथा सरकार वेगळे धोरण स्वीकारेल, असे विखे म्हणाले.