शेतकरी हा साऱ्या समाजाची गरज भागवतो. केंद्र सरकारने अन्नसुरक्षा कायदा केला असला तरी व त्यातून अत्यंत कमी दरात लोकांना धान्य मिळणार असले तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनास चांगला भाव मिळालाच पाहिजे. गरीब उपाशी राहता कामा नये, पण बळीराजाही शक्तिशाली झाला पाहिजे. तसे झाले नाही तर शेती आणि देशही उद्ध्वस्त होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे शेतकरी महामेळाव्यात केले.
येथील अकोला क्रिकेट क्लबच्या मदानावर हा भव्य मेळावा झाला. त्या वेळी प्रमुख भाषण करताना शरद पवार म्हणाले, यंदा देशाने २५ लाख टन गहू व २५ लाख टन साखरेची व ८१ लाख कापूस गाठींचीही निर्यात केली. यातून देशाला लाखोंचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. शेतकरी हा काळ्या आईशी इमान राखतो. त्यामुळे देशाच्या निर्यातीचे श्रेयही त्यालाच आहे. या बहुसंख्य लोकांच्या हिताची जपणूक केली नाही तर देश ताकदवान होणार नाही. यंदाच्या भयंकर पावसाळ्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या सर्वाना आधार देण्याचे काम केले जाईल. मीही शेतकरी कुटुंबातूनच आलो आहे. कास्तकारांच्या प्रश्नावर एकत्र येऊन काम करू, पुढची पिढी समृद्ध करण्याचे वचन देतो.
गेल्या वर्षी २५९ दशलक्ष टन धान्य देशात निर्माण झाले, असे सांगून ते म्हणाले, यंदा ७ लाख कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. पुढील वर्षी ते १५ लाख कोटी करण्याचा प्रयत्न राहील. शेतीचा विकास करण्यासाठी शेतीत गुंतवणूक करावी. २००४ मध्ये पीक कर्जावरील व्याज दर १२ टक्के होता. तो आता ४ टक्क्यांवर आणला आहे व यापुढे तो दर २ टक्के करण्याचा प्रयत्न करू. सहकारी चळवळीच्या ऐक्यातून ताकद निर्माण होईल. जगात व देशातही खत आणि डिझेल आदींचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धान्याचे भाव वाढावेत, ही माझी मागणी आहे.
जिल्हा सहकारी बँकेबाबत ते म्हणाले, अण्णासाहेब कोरपे यांनी या बँकेची घडी बसविल्यामुळे बँकेची आज एवढी प्रगती झाली. नागपूरचे बाबासाहेब केदार, अकोल्याचे नानासाहेब सपकाळ, वाघ व अण्णासाहेब कोरपे यांनी राज्यात सहकार चळवळ सुदृढ केली. या चळवळीचा विस्तार केला. जे शेतकऱ्यांचे हित तेच समाजाचे हित, हा कोरपे यांचा विचार होता. वा. रा. कोरपे शेतकरी योद्धा होते. सहकारी क्षेत्रात सरकारी हस्तक्षेप कमी करण्यासाठी कायदा दुरुस्ती केली. त्यामुळेच सहकार क्षेत्र व्यापक झाले, असे सांगून थोडा विनोद करताना ते म्हणाले, दूरचित्रवाणीवर जेव्हा महागाईवर चर्चा दाखविली जाते, तेव्हा माझे छायाचित्र हमखास दाखविले जाते.  
या शेतकरी मेळाव्यात अनिल देशमुख, केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल व वनमंत्री पतंगराव कदम यांचीही भाषणे झाली. वनमंत्री पतंगराव कदम म्हणाले, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. महाराष्ट्रात विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. वीज दरवाढीमुळे उद्योग राज्याबाहेर जाण्याची भीती आहे. या वेळी तिजोरीचा विचार करून चालणार नाही. राज्यात निवडणुकीला एकजुटीने तोंड द्यायचे आहे. राज्यातील राजकारण बिघडू द्यायचे नाही.
पटेल म्हणाले, राज्यात १६ लाख हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पाला केंद्राकडून ७ हजार कोटी रुपये मिळणार असल्याने सिंचन वाढेल. महाराष्ट्रात विजेचा दर इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्जावर शून्य टक्के, २ लाखांवर २ टक्के व ३ लाखांवर ४ टक्के व्याजदर असावा, असा प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठविला आहे. त्यावर पवारांनी मंजुरी मिळवून द्यावी.
आज सकाळी १०.३० च्या सुमाराला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात सहकार महर्षी वा. रा. ऊर्फ अण्णासाहेब कोरपे यांच्या प्रेरणाशिल्पाचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी महामेळाव्यात प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषदादा कोरपे यांनी केले, तर सूत्रसंचालन वासंती वर्तक यांनी केले. बँकेच्या महत्त्वाकांक्षी अशा केसीसी कार्डचे उद्घाटन करण्यात आले व हे प्रथम कार्ड अंबादास चतरकर या ८० वर्षीय शेतकऱ्यास पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आभार वामनराव देशमुख यांनी मानले.पवारांचे भाषण सुरू असताना काही शेतकऱ्यांनी उठून निवेदने देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना रोखण्यात आले. एका कार्यकर्त्यांने त्यांची निवेदने स्वत:जवळ ठेवून दिली.