कांद्याला भाव मिळतो काय.. शेतीला पाणी देता येते का.. पाणी देण्यासाठी पुरेशी वीज आहे का.. असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यास तत्कालीन काँग्रेस आघाडी शासन जबाबदार असल्याचे टीकास्त्र सोडले. छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी ठाकरी शैलीत तोफ डागली. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केले जाणार असून कृषी मालास रास्त भाव, अखंड वीजपुरवठा, अन्य सोयीसुविधा देण्याकडे लक्ष दिले जाईल. यासाठी सर्व घटकांनी शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ येवला येथे शुक्रवारी दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर शरसंधान साधले. कांद्याचे भाव घसरत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा व अडचणीत आलेल्या शेतीकडे प्रत्येक राजकीय पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेना ही त्यास अपवाद राहिली नसल्याचे पाहावयास मिळाले. कांदा प्रश्नासोबत, वीज, पाणी, कृषी पंप आदी प्रश्नात तत्कालीन राज्य सरकारच्या अनास्थेवर ठाकरे यांनी ताशेरे ओढले. येवल्यात अद्याप पाणी प्रश्न आहे तसाच आहे. मागील निवडणुकीत छगन भुजबळांनी सत्ता द्या, मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. निवडून आल्यानंतर पालखेड प्रकल्पातील आर्वतने काही अंशी थांबविण्यात आली. पण पाणी प्रश्न सुटला नाही. भुजबळांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले, अशा शब्दात ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. आता निवडणुकीत भुजबळांना पाणी पाजायची संधी तुम्हाला मिळाली आहे, असेही ते म्हणाले. भुजबळांच्या प्रयत्नांमुळे आज पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले. मात्र महात्मा व्यक्तींबद्दल इतका आदर आहे तर स्वत:च्या शैक्षणिक संस्थेला त्यांचे नाव का दिले नाही, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. शासकीय आस्थापनांसाठी त्यांना महात्मा, आंबेडकर यांची आठवण येते, असा टोलाही लगावला. शहरात पैठणी क्लस्टरच्या नावाखाली जागा ताब्यात घेतली. ती जागा मुलाच्या नावे वर्ग करत सध्या त्या क्लस्टरचे काय झाले हे सर्वश्रृत आहे. काँग्रेस सरकार सध्या पीक कर्ज माफीची जाहिरात करते. मात्र सरकारने अद्याप गारपीट ग्रस्तांना त्यांची हक्काची अशी नुकसानभरपाई दिलेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट सुरू झाले. असंख्य महिला त्यामध्ये सहभागी झाल्या. पण पापड आणि लोणची यापलीकडे त्यांनी फारसे काही केले नाही. महाराष्ट्र पापड लाटतोय आणि काँग्रेस, राष्ट्रवादी लोणचे घालते असा ठाकरी भाषेत त्यांनी टोला लगावला. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महिला बचत गटांमार्फत निर्माण होणाऱ्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. सेनेच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. राज्यात सत्ता आल्यावर तो जाहिरनामा प्रत्यक्षात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांबद्दल बोलताना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना ठाकरे यांनी उजाळा दिला. त्यांना महाराष्ट्राची नस उमगली होती. मुंम्डे यांच्या मृत्यूनंतर प्रथमच जेव्हा कांदा प्रश्न समोर आला, तेव्हा आपण सांभाळण्याचा प्रयत्न केला. शेकाप आणि अन्य शेतकऱ्यांना आंदोलन करू नका. त्याऐवजी मेळावा भरवा. त्यात शेतकऱ्यांच्या भावना खासदारांमार्फत केंद्रापर्यंत पोहचवू अशी भूमिका आपण घेतली. कोणत्याही स्थितीत आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ‘तुम्ही जा पुढे, शेतकरी माझ्या सोबत आहे’ असेही ते म्हणाले.