आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या अपर्णा भोयरचे प्रतिपादन
मुलींना क्रीडाक्षेत्रात आयुष्य घडविण्याच्या भरपूर संधी आज उपलब्ध आहेत, पण त्याच कमी पडतात. आवडता खेळ व दैनंदिन अभ्यास याचा ताळमेळ गाठल्यास मुलींना यशाचे शिखर गाठणे अवघड नाही, असा सल्ला आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या माजी आंतरराष्ट्रीय धावपटू अपर्णा भोयर-ठाकरे यांनी विद्यार्थिनींना दिला.
येथील बापुराव देशमुख फोऊंडेशनच्या प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयातर्फे  आयोजित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. विदर्भातील पहिल्या महिला आंतरराष्ट्रीय धावपटू चारूलता नायगावकर-बेहरे यांची विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थिनींना संबोधतांना या दोन्ही महिला क्रीडापटूंनी मोलाचा सल्ला दिला. देशाची निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्यांचाही देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा अपेक्षित आहे. त्यांनी स्पर्धेत उतरून स्वत:ला सिध्द करावे. सन्मान व प्रतिष्ठा मुलींना प्राप्त होईल. सातत्य, संयम व संस्कार या त्रिसूत्रीचे संस्कार क्रीडांगणावरच मिळू शकतात. त्यांनी संधी सोडू नये, असे आवाहन अपर्णा भोयर यांनी केले.
मुलींनी मनसोक्त खेळावे. क्रीडांगणावरच सहचर्य, स्नेहभाव व विचारांचे आदानप्रधान होते. आपल्या क्षमता ओळखा. जिद्द ठेवा. परिश्रम करा. तोच खेळाडूच्या यशाचा मार्ग आहे. अभ्यास व घर सांभाळूनही करिअर घडविता येते. असे मत चारूलता बेहरे यांनी विविध महिला खेळाडूंची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. रंभा सोनाये यांनी दोन्ही खेळाडूंचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार केला. क्रीडा महोत्सवाच्या संयोजक प्रा.सोनाली शिरभाते यांनी उपक्रमाची माहिती दिली. रोहिणी महाबुधे व सीमा दुबे यांनी संचालन केले. स्पर्धेत अ‍ॅथ्लेटिक्स, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल व अन्य खेळांच्या स्पर्धा झाल्या.