लोकभाषेतून येणारे साहित्य दु:खाचे मूल्य शोधत माणसाला झोंबी आणणारे असते. त्या झोंबीने दु:खाचे मूल्य माणसाला कळत असते. साहित्याला मूल्यप्रामाण्याची जोड दिली की, ते साहित्य त्रिकालाबाधित कार्यरत असते. प्रादेशिकतेचे प्रामाण्य झुगारून जीवनाचा तळ शोधणारे साहित्य आले पाहिजे.
साहित्याला कारागिरी न करता जसे आहे तसे येऊ द्यावे. अशाच प्रकारची साहित्य निर्मिती भगवान ठगांनी केली. त्यांची साहित्यक्षेत्रातील कामगिरी लोकभाषेतूनच केलेली आहे. त्यांची साहित्यिक कामगिरी माणसाला जोडण्याचे काम करीत आलेली आहे. हेच काम ‘भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कारा’च्या निमित्ताने बुलढाणा येथे होत आहे, असे मत पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना मांडले.
या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द उर्दु शायर व शल्यचिकित्सक डॉ. गणेश गायकवाड, तर विशेष उपस्थितांमध्ये संचालक कार्यकारी मंडळ विजय अंभोरे, अध्यक्ष विश्वनाथ माळी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्रोही कवी तुकाराम महाराज आणि कवी, समीक्षक व अनुवादक भगवान ठग यांच्या ५८ व्या जयंती निमित्ताने पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. पार्वतीबाई ठग व आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात ‘भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कार-२०१२’ च्या संयोजिका वैशाली ठग-जाधव यांनी पुरस्काराची  भूमिक व भावी वाटचालींसंबंधी भाष्य करून भगवान ठगांचे साहित्य व साहित्यिक कामगिरीसंबंधी महत्त्वपूर्ण विवेचन केले. प्रमुख अतिथी व मान्यवरांचा परिचय संयोजकांपैकी सुरेश साबळे यांनी करून दिल्यानंतर विविध मान्यवरांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.  
पुरस्कारप्राप्त गं्रथांमध्ये- क वितासंग्रहासाठी बहरलेलं झाड- मनोहर रणपिसे मुंबई, पालाला पंख फुटू दे- दिनकर राठोड सुलतानपूर (जि.बुलढाणा), कादंबरीसाठी- कृष्णातीर- शाम फरांदे पुणे, वैचारिकसाठी- जागतिकीकरण, मराठी भाषा आणि शासन- प्रा.डॉ. भास्कर पाटील, अकोला, कथासंग्रहासाठी- नातगोतं- दिवाकर बोबडे, नागपूर, समीक्षा/संपादितसाठी- बिराडच्या निमित्ताने- प्रा.डॉ. अनंता सूर, यवतमाळ, अनुवादासाठी- द फ्रेण्डशिप फॅक्टर- डॉ. शकुंतला कोलारकर, नागपूर यांना डॉ. गंगाधर पानतावणे व अतिथींच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आल्यानंतर पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी  मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. गणेश गायकवाड यांनी यापुढे होणाऱ्या या पुरस्करासाठी साहित्यिक व रसिकांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान ठगांवर आणि त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या साहित्य रसिकांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी अक ोला, मुक्ताईनगर, भुसावळ, लोणार, मेहकर, चिखली, जळगाव जामोद अशा विविध ठिकाणाहून व राज्यभरातून प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार व साहित्य रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. विनोद यांनी, तर आभार सुरेश साबळे यांनी मानले.