पक्षाने आदेश दिला, तर सांगली लोकसभेच्या मैदानात उतरण्याची आपली तयारी आहे, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन विधानसभेत आवाज उठविला असल्याने जिल्ह्यातील लोक मला सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सांगली लोकसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कोणाला िरगणात उतरविते याची उत्सुकता असताना आ. पवार यांनी मदानात उतरण्याचे निश्चित केले आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवार न देता काँग्रेस बंडखोराला पाठीशी घालण्याचे प्रयत्न केले होते.
श्री. पवार यांनी सांगितले, की सांगली लोकसभेसाठी पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी आपली चर्चा झाली असून आपल्याला उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक भूमिका मुंडे यांनी घेतली आहे. कोणत्याही स्थितीत पक्षाच्या चिन्हावरच भाजप या वेळी लोकसभा निवडणूक लढवेल असेही त्यांनी सांगितले.