काँग्रेसचा खरा शत्रू काँग्रेसच असल्याचे नमूद करतानाच जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती अध्यक्ष बदलल्याने नव्हे तर गटबाजीचा संपूर्ण नायनाट केल्याशिवाय सुधारणार नाही, अशी बाजू निष्ठावंतांनी मांडली आहे.

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची स्थिती अत्यंत नाजूक आहे किंवा तेथे पक्ष कमकुवत स्थितीत आहे अशा दहा जिल्हाध्यक्षांना बदलण्याच्या हालचाली प्रदेश पातळीवर सुरू झाल्या आहेत. त्यात जळगाव जिल्हा अध्यक्षांचाही समावेश असल्याने जळगावातील काँग्रेस पक्षांर्तगत असलेली गटबाजी अधिकच उफाळून आल्याचे दिसत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळच असल्याने राज्यातील दहा अध्यक्ष एकदम पदावरून दूर करण्यापेक्षा त्या त्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घेण्याबाबत अलीकडेच मुंबई येथे पक्षाची आढावा बैठक झाली होती. जळगावमधून या बैठकीस अ‍ॅड. ललिता पाटील (अमळनेर), संजय गरुड (जामनेर) या २००९ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसह माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे सहयोगी सदस्य आ. शिरीष चौधरी व मनीष जैन हे उपस्थित होते. या बैठकीनंतर काही जणांनी ३१ मेपर्यंत  जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांची सुट्टी करण्यात येणार असल्याचा पद्धतशीरपणे प्रचार केला. त्यामुळे काही इच्छुकांची नावे चर्चेत आली. विद्यमान जिल्हाध्यक्षांच्या समर्थनार्थही काही पदाधिकारी पुढे आले. त्यांनी पाटील यांच्यावर विश्वास असल्याचा तसेच त्यांच्या कार्यकाळात पक्षाची ताकद वाढणार असल्याचे प्रस्ताव केले. विवेक ठाकरे यांनी उदय पाटील यांच्या विरुद्ध आवाज उठविला. आपल्या बचावासाठी त्यांच्याकडून प्रस्ताव पाठविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. ठाकरे यांच्या आरोपानंतर आता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यांच्याविरुद्ध जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांत फसवणुकीसारखे गुन्हे दाखल आहेत.
उदय पाटील जिल्हाध्यक्ष झाल्यापासून पक्षातीलच त्यांच्या विरोधकांनी पाटील हे अमुक तारखेस पायउतार होणार अशा तारखाही जाहीर केल्या होत्या. परंतु तसे काहीही झालेले नाही. त्यामुळे अजूनही जिल्हाध्यक्षपदी तेच कायम आहेत. त्यांना अचानक हटवून दुसऱ्या कोणाला संधी दिल्यास पाटलांचा गट नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात काँग्रेसमध्ये सुधारणा करायची झाल्यास पक्षांतर्गत असलेली गटबाजी संपविणे आवश्यक आहे. अध्यक्ष बदलणे हा त्यावर उपाय नसून प्रा. व्ही. जी. पाटील, डी. जी. पाटील, डॉ. जी. एन. पाटील असे विविध गट एकत्र येणे गरजेचे आहे. हे सर्व गट एकत्र आल्यास यश निश्चित लाभेल अन्यथा पक्षाचे जिल्ह्यात पानिपत ठरलेले आहे, असे मत चोपडा, यावल, भुसावळ व जळगाव येथील अनेक निष्ठावंत काँग्रेसजनांनी मांडले आहे.