लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरच्या हिताबाबत तडजोड केली नाही. त्यांच्याच विचाराचा वारसा आपण पुढे चालवणार असून लातूरच्या हितातच माझे हित आहे, असे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले.
माध्यम परिवाराच्या वतीने विलासराव देशमुख यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीसंबंधी समग्र माहिती देणाऱ्या ‘आतला आवाज’ या गौरवांकाचे प्रकाशन आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले; त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात आमदार देशमुख यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. उपस्थितांतूनही देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आले. विलासरावांचे लातूरवर इतके प्रेम होते की, लातूरच्या हिताच्या आड मी जरी आलो असतो तरी त्यांनी मला दूर सारून लातूरच्या हिताला प्राधान्य दिले असते, असे देशमुख म्हणाले. शहर विकासाची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आपण स्वीकारली आहे. शहराचा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा संकल्प आपण केला असून तो नक्की पूर्ण करू. मनपात सत्ताधारी व विरोधकांत झालेल्या हाणामारीविषयी ते म्हणाले की, झालेली घटना चुकीची आहे. मात्र, या घटनेला सत्ताधारी व विरोधक तितकेच जबाबदार असल्याची टिप्पणी त्यांनी केली. औसा तालुक्यातील टेंभी येथील रेंगाळत असलेल्या विद्युत निर्मिती प्रकल्पासंबंधी ते म्हणाले, तो प्रकल्प गॅसवर आधारित आहे. गॅस देण्यासंबंधीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प रेंगाळेल. मात्र, तो निर्णय झाल्यावर हा प्रकल्प कार्यान्वित होईल, असे आमदार देशमुख यांनी सांगितले.