गावोगावी इतिहासाच्या असंख्य वास्तू, अवशेष, साक्षीदार आज उपेक्षेचे जीवन जगत आहेत. त्यांचे जतन करायचे असेल तर प्रत्येकाच्या मनात या विषयाची जागृती करणे गरजेचे आहे. याकामी जनतेतील सुजाण नागरिकांपासून ते शासनापर्यंत साऱ्यांचीच जबाबदारी आहे. इतिहासाचे हे धन वेळीच जतन केले नाही तर येणारा काळ माफ करणार नाही, असे मत ‘लोकसत्ता’चे सहसंपादक अभिजित बेल्हेकर यांनी व्यक्त केले.
सोलापुरातील ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख लिखित ‘सोलापूर जिल्ह्याचा इतिहास’ (मराठा कालखंड) या संशोधनपर ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा बेल्हेकर यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. कौसल्या प्रकाशन संस्थेच्या वतीने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये माजी आमदार निर्मला ठोकळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने व मंगळवेढय़ाच्या संत दामाजी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. नंदकुमार पवार, कुसुम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोपाळराव देशमुख यांनी इतिहासाविषयी कुतूहल अंगी बाळगून, प्रचंड मेहनत घेऊन व व्यासंग जोपासत इतिहाससंशोधन केले. त्याहून चांगला इतिहास समोर आणला. सरकारी दफ्तरखान्यात सेवेत असताना देशमुखांनी इतिहासाचा दफ्तरखाना खुला केल्याबद्दल बेल्हेकर यांनी प्रशंसोद्गार काढले. ते म्हणाले, आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान बाळगण्याबरोबरच तो जतन करणे, त्याच्या अवशेषांची काळजी घेणेही गरजेचे आहे. केवळ ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देऊन भावनेवर हे काम होणार नाही. अनेक ऐतिहासिक वास्तूंना आज जीर्णोद्धाराची कीड लागली आहे. जुनी मंदिरे पाडून नवीन बांधायची, रंगरंगोटी करायची, यामुळे इतिहासाची मोठी हानी होत आहे. या वास्तू आहे त्या स्थितीत, त्यांच्यातील इतिहासाचा चेहरा सांभाळत जतन केल्या नाही तर त्यांना काहीच अर्थ उरणार नाही. उपेक्षा आणि जीर्णोद्धाराच्या किडीपासून या ऐतिहासिक वास्तूंना वाचवणे गरजेचे आहे. यासाठी जनजागृती, समाजशिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात निर्मला ठोकळ यांनी प्रत्येकाच्या जिव्हाळय़ाचा विषय असलेल्या इतिहासाचे लेखन करणे ही सोपी गोष्ट नाही. हे जबाबदारीचे काम गोपाळराव देशमुखांनी केल्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अ‍ॅड. धनंजय माने यांनी लेखक गोपाळराव देशमुख यांच्यासारख्या ज्ञानी माणसाची ओळख झाली हे आपले भाग्य असल्याचे नमूद करीत त्यांच्या इतिहासलेखनाच्या पलूंवर प्रकाश टाकला. मराठय़ांच्या देशभरातील पराक्रमावरही इतिहासलेखन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी पुणे विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हरिदास रणदिवे, विलास देशमुख, जगदीश बाबर आदींची भाषणे झाली. लेखक गोपाळराव देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्याच्या मराठा कालखंडातील वैभवाचा इतिहास विसरला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. आनंद चव्हाण यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर शिवानी चव्हाण हिने आभार मानले.