News Flash

इगतपुरीतील शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध

तालुक्यातील वाडीवऱ्हे शिवारात मोठय़ा प्रमाणात शेतजमीन क्षेत्र शासनाने विविध प्रकल्पांसाठी संपादित केलेले असताना आता उर्वरित शेतजमीनही

| December 21, 2013 01:19 am

तालुक्यातील वाडीवऱ्हे शिवारात मोठय़ा प्रमाणात शेतजमीन क्षेत्र शासनाने विविध प्रकल्पांसाठी संपादित केलेले असताना आता उर्वरित शेतजमीनही औद्योगिकीकरणाच्या नावाखाली संपादित करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन शासनाने जमीन संपादित करू नये तसेच शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये, अशी मागणी आ. निर्मला गावित यांनी शेतकऱ्यांच्या वतीने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे केली आहे.
वाडीवऱ्हे परिसरातील सुपीक शेतजमीन यापूर्वी धरण, महामार्ग, लष्कर, औद्योगिकीकरण, रेल्वेमार्ग आदी प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आली आहे. असे असताना अजूनही शेतजमीन संपादित करण्यासाठी शासनाच्या वतीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या प्रकारास वाडीवऱ्हे परिसरातील शेतकऱ्यांनी कडवा विरोध केला असून नवीन प्रकल्पांसाठी एक इंचही जमीन देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन तालुक्याच्या आमदार गावित यांनी शासनाने जमीन संपादित करू नये यासाठी पुढाकार घेतला आहे.
आ. गावित यांनी उद्योगमंत्री राणे यांची नागपूर येथे भेट घेऊन भूसंपादनाची सविस्तर परिस्थिती व शेतकऱ्यांचा विरोध स्पष्ट करून यापूर्वी या परिसरातील किती क्षेत्र संपादित करण्यात आले आणि आता २४५.११ हेक्टर क्षेत्र औद्योगिकीकरणासाठी संपादित करण्याचा घाट शासनाच्या वतीने सुरू आहे, त्याची माहिती दिली. शेतकऱ्यांचा कडवा विरोध लक्षात घेऊन ही भूसंपादन प्रक्रिया थांबवावी, औद्योगिकीकरणासाठी जमीन घेऊ नये, अशी मागणी राणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 1:19 am

Web Title: igatpuri farmers oppose land acquisition
टॅग : Land Acquisition
Next Stories
1 शासकीय अधिकाऱ्यांचाही सन्मानपत्रासोबत आर्थिक मदतीची अपेक्षा
2 कांदा पेटला..
3 काम बंद आंदोलनामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट
Just Now!
X