शकुंतला रेल्वेगाडी सुरू करावी म्हणून गेल्या २७ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल खासदार दत्ता मेघे यांच्याप्रती रोष व्यक्त केला आहे.
रेल्वेच्या अखत्यारित हा प्रश्न येत असल्याने खासदारांनी या प्रश्नावरील भूमिका महत्वाची ठरते, असे मत कृती समितीचे निमंत्रक बाळासाहेब गलाट यांनी व्यक्त केले. पुलगाव-आर्वी मार्गावर धावणारी शकुंतला पॅसेजर गाडी पाच वर्षांंपासून बंद आहे. ती पूर्ववत सुरू होती तेव्हा परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, किरकोळ व्यापारी या सेवेचा लाभ घेत होते. त्यांना आता अन्यत्र संपर्क साधण्यासाठी मोठय़ा अडचणी सोसाव्या लागत असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे.
या पाश्र्वभूमीवर परिसरातील ५० वर गावांनी विविध प्रकारे या प्रश्नावर लक्ष वेधले. रेल्वेमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, खासदार व अन्य मान्यवरांना निवेदने देण्यात आली. शिष्टमंडळ भेटले. लाखो पत्रे पाठविण्यात आली. पण, एकाही लोकप्रतिनिधीने याकडे गांभिर्याने पाहिले नाही. याउलट, अशीच नॅरोगेजवर चालणारी मूर्तीजापूर पॅसेंजर तेथील खासदारांनी पूर्ववत सुरू करवून घेतली. येथील खासदार दत्ता मेघे यांनी प्रश्नावर सहानुभूतीने लक्ष घातल्यास ही मागणी पूर्ण होऊ शकते, गाडी पूर्ववत सुरू व्हावी. नॅरोगेज म्हणून तिचे रूपांतर ब्रॉडगेजमधे व्हावे. वरूड-मोर्शीपर्यंत अंतर वाढवावे, अशा मागण्या असून खासदारांना त्याबाबत अवगत करण्यात आले आहे. विविध प्रकारे लक्ष वेधूनही मागणीस प्रतिसाद न मिळाल्याने १ मे पासून रोहणा येथे पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत व पुलगावचे रेल्वे व्यवस्थापकांनीच आंदोलकांची विचारपूस केली. जिल्ह्य़ातील कुठल्याही मागणीची तत्परतेने दखल घेणारे खासदार मेघे आमच्याबाबत उदासीन का, असा सवाल कृती समितीने केला.