सोयाबीनला मिळणारा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा नसल्यामुळे क्विंटलला किमान साडेपाच हजार रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी लातुरात दोन मेळावे घेतले. मात्र, महायुतीशी घरोबा होताच शेट्टी यांनी सोयाबीनचा भाव दीड हजार रुपयांनी कमी, ४ हजार घेण्यास मान्यता दाखविली! मात्र, दीड हजार रुपये कमी भाव घेतल्याबद्दल सोयाबीन उत्पादकांत संताप व्यक्त होत आहे.
आपण केवळ पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेते नसून, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करीत असल्याची भावना शेतकऱ्यांत निर्माण व्हावी, यासाठी शेट्टी यांनी मराठवाडा व विदर्भात शेतकरी मेळावे घेतले होते. लातूर शहर व अहमदपूर येथे    सोयाबीनला साडेपाच हजार भाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी करीत शेतकऱ्यांच्या भावनेला शेट्टी यांनी हात घातला. लढवय्या नेता पाठीशी असल्यामुळे सोयाबीनला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. भाजप नेते पाशा पटेल यांनी औसा तालुक्यातील लोदगा ते औरंगाबाद विभागीय आयुक्तालयापर्यंत सोयाबीनला योग्य भावाच्या मागणीसाठी पायी िदडी काढली. बीड लोकसभा मतदारसंघातून िदडीचा सर्वाधिक प्रवास झाला. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह, लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत औरंगाबादला दिंडीचा समारोप झाला. सोयाबीनच्या भावासाठी भाजपनेही रान उठविले.
यंदा सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर भाव प्रतिक्विंटलला ३ हजार ८०० रुपये होता. जानेवारीनंतर तो ४ हजारांपेक्षा अधिक होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, गेले काही दिवस सोयाबीनच्या भावात घसरण होत आहे. त्यामुळे हतबल झालेला शेतकरी आपला माल विकत आहे. खासदार राजू शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी महायुतीत प्रवेश केला. मंगळवारी गोपीनाथ मुंडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे रामदास आठवले, राजू शेट्टी व महादेव जानकर यांच्या मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत सोयाबीनला ४ हजार रुपये क्विंटल भाव मिळावा, अशी शेट्टी यांची मागणी असल्याचे जाहीर करण्यात आले.
गतवर्षी राज्य सरकारने केंद्राच्या हमीभाव ठरवणाऱ्या समितीकडे सोयाबीनला किमान ३ हजार ९५७ रुपये हमीभाव द्यावा, असे सुचवले होते. स्वामीनाथन समितीने शेतकऱ्यांना शेतीमालाचा भाव मिळताना उत्पादन खर्च व किमान ५० टक्के नफा या धर्तीवर भाव मिळाला पाहिजे, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार सोयाबीनचा भाव क्विंटलला ६ हजार रुपये होतो. दोन वर्षांपूर्वी बाजारपेठेत काही दिवस सोयाबीनचा भाव क्विंटलला ५ हजार २०० रुपये होता.
शेट्टी यांनी शेतकऱ्यांना स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, अशी मागणी केली होती. भाजपचे नेते पाशा पटेल यांनी यासाठी पायी िदडी काढली. परंतु महायुतीत नेमके काय घडले की ज्यामुळे सोयाबीनच्या भावाची मागणी एकदम दीड हजार रुपयांनी घसरली, हे न उलगडणारे कोडे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न गणिताने सोडवले जावेत, त्याला शास्त्रीय आधार हवा. तोंडाला येईल ते शेतकरी नेते बोलू लागले, तडजोडी करू लागले तर विश्वास कोणावर ठेवायचा? तसेच शेतीमालाचे भाव हे काही मटक्याचे भाव नाहीत. ते शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित आहेत. किमान इतके भान ठेवले जाणार काय, असा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल आहे. पाशा पटेल यांनी या बाबत संयत शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणत्याही नेत्याने पुरेसे गांभीर्य ठेवूनच बोलले पाहिजे, असे ते म्हणाले. शेट्टी महायुतीत आल्यामुळे पटेल यांना ‘खरे’ बोलण्यापेक्षा ‘बरे’ बोलण्यावाचून पर्याय नाही!
तडजोडीचा भाव- शेट्टी
शेट्टी यांनी आपलाच शब्द मागे का घेतला? अशी त्यांच्याकडे दूरध्वनीवर विचारणा केली असता ते म्हणाले की, बठकीत बसल्यानंतर आपल्याच मागणीवर ठाम राहता येत नाही. सर्वानुमते घटक पक्षांचा विचार घेऊन ४ हजार रुपये भाव मागावा असे ठरले. त्यामुळे आपण तडजोड स्वीकारली. शिवाय सध्या ४ हजार रुपयांपेक्षा बाजारात भाव कमी असल्यामुळे ही मागणी केल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.