परभणीत बोकाळलेल्या डिजिटल बॅनर्सविरुद्ध महापालिका ठोस कारवाई करीत नसल्यामुळे शहर विद्रूप झाले आहे. सर्वच पक्षांच्या व संघटनांच्या नेत्यांनी उथळ प्रसिद्धीसाठी फलकबाजी सुरू केल्याने आता जनतेनेच याकामी पुढाकार घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. जागोजागी अनधिकृत लागलेले जाहिरात फलक व सार्वजनिक ठिकाणी बोकाळलेली फलक संस्कृती यातून शहराला वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे वाढदिवस व वरिष्ठ नेत्यांच्या आगमनाचे स्वागत करणाऱ्या कमानी यांची बजबजपुरी मोठी डोकेदुखी ठरली आहे.
जाहिरात फलकांच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने फलकबाजी असली, तरी ज्या एजन्सीने महापालिकेसोबत करार केला तिने तो करार तर पाळला नाही. पण बाकीच्याही एजन्सींनी शहरात जागोजागी बेकायदा होर्डिग्ज लावले आहेत. शहरात अनधिकृत फलक बोकाळण्यास सर्वच पक्ष जबाबदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा परभणी दौरा असो, नेत्यांच्या स्वागताच्या कमानी, जागोजागी त्यांच्या स्वागताचे झळकणारे फलक शहरात अमाप संख्येने लागत आहेत. केवळ राजकीय पक्षच याला जबाबदार आहेत असे नाही, तर विविध सामाजिक संघटनांचे नेते, चळवळीतल्या कार्यकर्त्यांचेही बॅनर शहरात वर्षभर झळकत असतात. सर्वच राजकीय, सामाजिक पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांकडून उथळ प्रसिद्धीसाठी हे फलकबाजीचे तंत्र वापरले जात आहे.
अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात परभणीतल्या होर्डिग्जबद्दल नापसंती व्यक्त केली होती. पवारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी नेत्यांनी शहरात फलक लावले होते. आपल्या स्वागताच्या कमानी लावणाऱ्या कार्यकर्त्यांची पवारांनी जाहीर कानउघाडणी केली होती. मात्र, पक्षनेत्याने फटकारल्यानंतरही कार्यकर्त्यांनी त्यातून काहीही बोध घेतला नाही. उलट नेता येणार म्हटल्यावर राष्ट्रवादीत सर्वच गट-तटांना जोर चढतो. पक्षांतर्गत गटबाजी जाहिरात फलकांवरही दिसते. पण जाहिरातबाजीत एकमेकांना मागे टाकण्याच्या नादात शहरभर फलक लावून शहराला आणखीच अवकळा आणली जाते, याचे भान केव्हाच सुटलेले असते.
महापालिकेने अनधिकृत होर्डिग्जविरुद्ध हत्यार हाती घेतले असले, तरीही पोकळ नोटिसा देऊन ही फलकबाजी थांबणार नाही. महापौर प्रताप देशमुख यांनीही शहरातल्या या फलकबाजीकडे कानाडोळा चालवला आहे. पवारांनी सांगितलेला होर्डिग्जमुक्त शहर हा कानमंत्र अमलात आणण्याकडे त्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
शहरातल्या कोणत्याही रस्त्याच्या दुतर्फा बॅनरबाजीचे पीक फोफावले आहे. या धंद्यातले एजन्सीचालक महापालिकेला लाखो रुपयांना फसवत आहेत. शहरातील विधायक काम करणाऱ्या सामाजिक संघटनांनी आता महापालिकेवरच शहर होर्डिग्जमुक्त करण्यासाठी दबाव टाकण्याची गरज आहे.