टोलनाके जाळपोळीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार व शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांना पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी गुरुवारी निलंबित केले. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.विजयसिंह जाधव यांनी भाष्य करण्याचे टाळले. तर टोलविरोधी कृती समितीने पवार व केडगे यांच्या निलंबनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविल्याने याप्रकरणावरूनही नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.     
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर टोल आकारणीचे काम आयआरबी कंपनीने सुरू केले होते. या टोलनाक्यांना संरक्षण देण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले होते. तथापि १२ जानेवारी रोजी टोल आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी शहरातील टोलनाके पेटवून दिले. हजारो करवीरकरांचा टोलविरोधातील उद्रेक यावेळी पहायला मिळाला. मात्र आंदोलकांना रोखण्याऐवजी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असा ठपका वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी ठेवला आहे.
शिरोली टोलनाका येथे आंदोलनाचा मोठा भडका उडाला होता. हे स्थळ शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलीस निरीक्षक केडगे यांना जबाबदार धरण्यात आले. तर शहराची जबाबदारी उपअधीक्षक विठ्ठल पवार यांच्याकडेअसताना त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतीप्रियासिंग यांनी विठ्ठल पवार यांना लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला होता, पण त्यांनी तो पाळला नव्हता, हा ठपका ठेवूनच पवार व केडगे या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पोलीस उपअधीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. तर निलंबित करण्यात आलेल्या दोघाही अधिका-यांचे भ्रमणध्वनी बंद होते.    
दरम्यान टोलविरोधी कृती समितीने पवार व केडगे यांना निलंबित करून प्रामाणिक अधिका-यांचा बळी दिला असल्याचा आरोप केला आहे. याबाबत कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे म्हणाले, शिरोलीनाका येथे प्रचंड जमाव जमला असताना पोलीस बंदोबस्त मात्र अपुरा होता. उपस्थित पोलीस अधिका-यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिस्थिती योग्यरीत्या हाताळली. त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असती तरी जमावाकडून मिळालेल्या प्रत्युत्तरामुळे अवघे कोल्हापूर शहर पेटले असते. शिरोली गावाकडून येणारा जमाव पवार व केडगे यांनी रोखला होता. तो शहरात पोहोचला असता तर अनर्थ घडला असता. त्यामुळे जमाव रोखणाऱ्या अधिका-यांना शाब्बासकी देण्याऐवजी त्यांना निलंबित केल्याने शासनाच्या भूमिकेचा कृती समिती निषेध नोंदवित आहे. ज्योतीप्रिया सिंग यांनी आयआरबी कंपनीला पुरक अशी भूमिका घेतल्याचा आरोप करून त्यांची बदली गडचिरोलीत करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्यासह आयआरबी कंपनीला पंचगंगा नदीत विसर्जित करण्याचा इशारा साळोखे यांनी दिला.
कोल्हापूरकरांचा स्वतंत्र प्रजासत्ताक दिन
२६ जानेवारी रोजी होणा-या शासकीय प्रजासत्ताक सोहळ्यामध्ये सहभागी न होता करवीरकरांचा स्वतंत्र प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा निर्णय गुरूवारी सायंकाळी झालेल्या टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शासकीय सोहळ्यात सहभागी न होता नागरिकांनी गांधी मैदान येथे होणाऱ्या स्वतंत्र सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ध्वजारोहणास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.
गृह खात्याची चलाखी
उच्च न्यायालयाने टोलनाक्यांना संरक्षण देण्याचे आदेश दिले असताना पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने टोलनाके पेटविण्यात आले. या मुद्दय़ावरून उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवेळी राज्य शासनावर ताशेरे पडण्याची दाट शक्यता आहे. याची जाणीव झाल्यानेच गृह विभागाने पवार व केडगे या दोघा अधिका-यांना निलंबित केल्याची कुजबूज पोलिसांमध्ये सुरू होती. तसेच गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीवेळी गोंधळ होऊन आमदार राजेश क्षीरसागर यांना ज्योतीप्रिया सिंग यांनी घेतलेल्या भूमिकेवरून अटक झाली होती. या घटनेवेळी पवार व केडगे यांनी क्षीरसागर यांना सहकार्य केल्याचीही कुजबूज असून त्याची परिणती पोलीस अधिका-यांच्या वादातून निलंबनात झाल्याचे सांगण्यात येते.