सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ हे शालेय पोषण आहार घोटाळा, सर्व शिक्षा अभियान घोटाळा, कार्यालय इमारत सुशोभीकरण घोटाळा यासह शैक्षणिक गुणवत्तेच्या अभावी विद्यार्थ्यांची होणारी प्रचंड गळती व त्यामुळे ओस पडणाऱ्या शाळा यासाठी प्रसिध्द ठरले असताना त्यात सुधारणा करण्याऐवजी सर्वच ६५ शाळांना राजकीय नेत्यांसह हितसंबंधीय मंडळींची नावे देण्याचा सपाटा लावला आहे. या नामकरणाच्या सपाटय़ात गांधी, टिळक, सावित्रीबाई फुले यासारख्या राष्ट्र तथा समाजपुरूषांचा शिक्षण मंडळाला विसर पडल्याचे दिसून येते. यात कहर म्हणजे, जाती व धर्मावर आधारित शाळांचे नामकरण होत असल्याने विद्यार्थ्यांना विशिष्ट जाती-धर्माचेच पाठ देणार काय, असा मुद्दाही उपस्थित झाला आहे.
शाळांचे नामकरण करताना सोलापूरच्या थोर चार हुतात्म्यांपैकी तीन हुतात्म्यांचा विचार झाला असून एका हुतात्म्याला उपेक्षित ठेवण्यात आल्याचेही दिसून येते. शाळांचा शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देण्याऐवजी सर्वच शाळांचे नामकरण करून काय साध्य होणार आहे, असाही सवाल शिक्षण क्षेत्रात उपस्थित केला जात आहे. अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा सोयीस्कर विसर शाळांच्या नामकरणाच्या सपाटय़ात शिक्षण मंडळाला पडला आहे. संपूर्ण स्वातंत्र्य लढय़ात एकमेव सोलापुरात १९३० साली झालेल्या मार्शल लॉ चळवळीत फासावर गेलेले जगन्नाथ शिंदे, मल्लप्पा धनशेट्टी, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन व श्रीकिशन सारडा या चार हुतात्म्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात सोलापूरचे नाव अजरामर केले आहे. हे चार हुतात्मे म्हणजे सोलापूरचा मानबिंदू आहे. परंतु त्यापैकी हुतात्मा श्रीकिशन सारडा यांचे नाव देण्यासाठी पालिका शिक्षण मंडळाकडे एकही शाळा उरली नसावी, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. शिक्षण मंडळावर काँग्रेसचे वर्चस्व कायम असून प्रा. व्यंकटेश कटके हे मंडळाचे सभापतिपद सांभाळत आहेत. प्रा. कटके हे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अनुयायी समजले जातात. त्यामुळे शाळांच्या नामकरणामध्ये एका शाळेला सुशीलकुमारांच्या मातोश्री सखुबाई संभाजीराव शिंदे यांचे नाव न विसरता देण्यात आले आहे. तर अलीकडे राजकारणात ‘बॅकफूट’वर गेलेले राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांचे एका शाळेला दिले गेलेले नाव कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे पाहावयास मिळते.
एकीकडे महात्मा गांधी व लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस व सावित्रीबाई फुले यांचा विसर पडणाऱ्या पालिका शिक्षण मंडळाला शाळांचे नामकरण करताना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्मरण झाले, हे विशेष. त्यामुळे पालिका प्राथमिक शिक्षण मंडळावर सत्ता काँग्रेसची की हिंदुत्ववादी संघटनांची, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. दुसरीकडे शाळांना नावे देताना त्या त्या जाती-धर्मापुरता संकुचित विचार झाल्याचे दिसून येते. उर्दू माध्यमांच्या शाळांना डॉ. अल्लामा इक्बाल, मिर्झा गालीब, हुतात्मा कुर्बान हुसेनपासून ते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्यापर्यंत विशिष्ट मंडळींचा विचार झाला. तर  कन्नड माध्यमाच्या शाळांसाठी राजर्षी शाहू महाराज व शहीद भगतसिंग यांचा अपवाद वगळता कन्नड भाषिक मंडळींनाच स्थान दिले. तेलुगु शाळांसाठीही याप्रमाणेच धोरण ठरविण्यात आल्याचे पाहावयास मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव एखाद्या उर्दू, कन्नड किंवा तेलुगू शाळेला दिले असते तर त्यातून शिक्षण मंडळाचा विधायक दृष्टिकोन दिसून आला असता, अशी प्रतिक्रिया शिक्षण व समाजप्रेमींनी व्यक्त केली आहे.