अवैध गर्भपात प्रकरणात विमानतळ पोलिसांनी िस्टग ऑपरेशन केल्यानंतर डॉ. कविता शिवणकर हिला अटक करण्यात आली. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये शहरातील बजरंग कॉलनी परिसरात आरेफा बेगम ही महिला अवैध गर्भपात केंद्र चालवत होती. तिला शहरातील काही डॉक्टरांची छुपी मदत मिळत होती. गेले दीड-दोन महिने सुरू असलेल्या या अवैध गर्भपात केंद्राचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांनी हे प्रकरण उजेडात आणत आरेफा बेगमच्या मुसक्या आवळल्या. याच प्रकरणात आरेफाला मदत करणाऱ्या डॉ. राजेश बत्तलवाड याला अटक करण्यात आली.
बत्तलवाड याच्या अटकेनंतर काही डॉक्टरांनी विमानतळ पोलिसांच्या तपासावर शंका व्यक्त केली. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्याकडे या प्रकरणी चौकशी देण्यात आली. या प्रकरणात आरेफाला डॉ. कविता शिवणकर हिची मदत होत होती. शिवाय डॉ. शिवणकर हिने स्वत: होमिओपॅथिक डॉक्टर असताना काही महिलांचा गर्भपात केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. बुधवारी दुपारी तीन वाजता विमानतळ पोलिसांच्या पथकाने डॉ. शिवणकर हिला तिच्या गणेशनगर परिसरातील घरातून अटक केली. उद्या तिला न्यायालयापुढे उभे केले जाणार आहे. डॉ. शिवणकर हिचा गर्भपात प्रकरणात थेट संबंध असल्याचे सांगून काही महिलांनी तसे जबाब नोंदवल्याचे सहायक पोलीस निरीक्षक साहू यांनी सांगितले.