ठाणे शहरातील अनधिकृत बारविरोधात कडक मोहीम हाती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले. ही कारवाई करण्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ठाणे शहरातील बेकायदा बारच्या बांधकामाचा मुद्दा सध्या गाजत असून महापालिकेतील काही अधिकारी अशा बारच्या बांधकामांना आश्रय देत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. ठाण्यातील ५२ लेडीज बारसंबंधीचा एक अहवाल मध्यंतरी ठाणे पोलिसांनी महापालिकेकडे सादर केला होता. या अहवालाच्या आधारे काही बारच्या बांधकामाविरोधात महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, बेकायदा बांधकाम असलेल्या लेडीज बारना अग्निशमन विभागाचा ‘ना हरकत’ दाखला दिला गेल्याची काही प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहे.
ठाणे शहरात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बार असून या ठिकाणी अग्निशमन विभागाचा ‘ना हरकत’ दाखला दिला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. या परवान्यांची मुदत संपत आल्याने त्यास मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी मध्यंतरी बार मालकांचे एक शिष्टमंडळ महापौर संजय मोरे आणि तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यामुळे महापालिका वर्तुळात वादंग निर्माण झाले होते. दरम्यान, ‘लंच होम’च्या नावाखाली काही बारमालकांनी अग्निशमन विभागाचे परवाने पदरी पाडून घेतल्याचा आरोप गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत करण्यात आला होता. अशा बारविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीही या वेळी लावून धरण्यात आली होती. अखेर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी अतिक्रमणविरोधी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत अशा बारविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. या बैठकीस अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख के. डी. निपूर्ती, अग्निशमन विभागाचे प्रमुख अरिवद मांडके, विधी सल्लागार काळे असे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बार मालकांचे म्हणणे ऐकून घेऊन सुनावणी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार तातडीने सुनावणी देऊन पुढील कारवाई सुरू करावी, असे आदेश या वेळी आयुक्तांनी दिले. या कारवाईत चालढकल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.