महापालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी भागातील १८ हजार चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर गेल्या पंधरा दिवसांपासून भूमाफियांनी कब्जा केला असून त्यावर अनधिकृत बांधकामे उभारण्याचा सपाटा लावला आहे. या बांधकामांना पालिकेच्या अधिकृत जलवाहिन्यांवरून चोरून पाणीपुरवठा सुरू करून घेण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार या भागाचे स्थानिक नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पालिकेच्या ‘ह’ प्रभाग, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला दिली आहे. मौजे गावदेवी येथील सव्‍‌र्हे क्रमांक ३२, आरक्षण क्रमांक ३११ हा सार्वजनिक उपयोगितेसाठी (उद्यान) पालिकेचा भूखंड आहे. हा भूखंड एका खासगी मालकीचा होता. या भूखंडावर आरक्षण असल्याने मालकाने या जागेचा ‘टीडीआर’ घेऊन ही जागा पालिकेच्या नावावर यापूर्वीच करून दिली आहे. त्यामुळे या भूखंडाचे संरक्षण करणे हे पालिकेच्या नगररचना, ‘ह’ प्रभागातील प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याचे काम आहे. मात्र हे दोन्ही विभाग भूमाफियांशी संगनमत करून गप्प बसले आहेत, असे नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले.
पालिकेचा कारभार सध्या प्रभारी आयुक्तांकडून सुरू आहे. प्रभाग क्षेत्र कार्यालयांमधील सात प्रभारी अधिकारी प्रभागांमध्ये कारभारी असल्याने या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे उभारण्यात येत आहेत. बहुतेक प्रभाग क्षेत्र अधिकारी निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहेत. त्यामुळे जाता जाता मारला हात पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे. ‘ह’ प्रभागात पूर्णवेळ प्रभाग अधिकारी नाही. प्रभारी अधिकाऱ्याकडून कामकाज केले जाते. १८ हजार चौरस मीटरचा भूखंड शहरातून खाडीकडे जाणाऱ्या मोठय़ा भोईरवाडी नाल्याला लागून आहे. या नाल्याच्या भिंतीची एक बाजू जोत्या म्हणून उपयोग करण्याचे काम भूमाफियांकडून सुरू आहे. पावसाळ्यात नाल्याची भिंत कोसळली तर नाल्यातील पाणी परिसरातील वस्तीमध्ये घुसण्याची शक्यता आहे, असे म्हात्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही आपल्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने लवकरच पालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे वामन म्हात्रे यांनी सांगितले.