प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या वीस हजार घरांना राज्य सरकारने मागील महिन्यात अभय दिल्यानंतर शिल्लक बेकायदा बांधकामांनाही सरकार कायम करणार असल्याच्या निर्वाळ्यामुळे नवी मुंबईत बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. गुरुवारपासून सुरू झालेली चार दिवसांची सुट्टी आणि निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेला पालिका कर्मचारी वर्ग ही संधी साधून घणसोली, रबाले आदी परिसरात बेकायदा बांधकामे वेगाने सुरू आहेत. पालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत गाव गावठाण मिळून बेकायदा बांधकामांचे २९ प्रभाग निर्माण झाले आहेत.
नवी मुंबईतील गाव गावठाण भागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. ही संख्या सिडकोने केलेल्या सर्वेक्षणानुसार पालिका क्षेत्रात १४ हजार घरांची आहे, पण ती दिशाभूल करणारी असून वास्तविक ही संख्या पाच पट अधिक आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यात यावीत या मागणीपोटी सरकारने ही बांधकामे क्लस्टर योजनेंर्तगत कायम केली आहेत, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या आडून या ठिकाणी अनेक भूमाफियांनी अनधिकृत बांधकामांचे इमले रातोरात उभे केले आहेत.  गावाजवळील जुन्या चाळी तोडून टॉवर बांधले जात आहेत. स्थानिक नगरसेवक, पोलीस, सिडको, पालिका आणि महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हा बेकायदा बांधकामांचा भस्मासुर उभा राहत आहे.
मागील दहा वर्षांत या घरांमध्ये राहण्यास आलेल्या रहिवाशांना तेथील पक्षीय कार्यकर्त्यांनी मतदार बनवून घेतले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत गाव गावठाण मिळून २९ प्रभाग निर्माण झाले आहेत. काही शहरी भागांतील प्रभागात ही नागरी वसाहत जोडली गेल्याने ही संख्या ४० प्रभागापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांच्या जोरावर येत्या पालिका सभागृहात ४० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणार आहेत. गाव गावठाण भागात असणाऱ्या या प्रभागाबरोबरच झोपडपट्टी भागात एक नगरसेवक संख्या वाढली असून ४७ हजार झोपडय़ांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे या ठिकाणाहून येणारे नगरसेवकही अनधिकृत झोपडपट्टय़ांना अभय देणार असल्याने नियोजनबद्ध शहरातील पालिकेचा कारभार अर्धे बेकायदा विभागातून आलेले नगरसेवक हाकणार आहेत. त्यात गुरुवारी महावीर जयंतीपासून सुरू झालेली सार्वजनिक सुट्टी व निवडणुकीत व्यस्त असणारे पालिका कर्मचाऱ्यांची संधी साधून गोठवली, घणसोली, तळवली, रबाले, कोपरी गावात रातोरात अनधिकृत बांधकामे तयार होत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.